अवकाळी पावसाचा आंब्याला तडाखा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, उमरगा व वाशी तालुक्याच्या काही भागांत रविवारी (ता.१०) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

कळंब (जि. उस्मानाबाद) : तालुक्‍यातील काही भागांत रविवारी (ता. १०) दुपारी पावणेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. तालुक्‍यातील भोगजी, इटकूर, हावरगाव परिसरात हा अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भोगजी परिसरात आंब्याचे मोठे नुकसान झाले असून, गारपीट झाल्याचे वृत्त आहे.

तालुक्‍यात काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज पावणेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अर्धा तास दमदार अवकाळी पाऊस झाला. दुपारी तीनच्या सुमारास ढग दाटून आले होते. वाऱ्यामुळे आभाळ पांगले. इटकूर, हावरगाव, भोगजी परिसरात पाऊस झाला.

अस्वस्थ वर्तमान 

वाऱ्यामुळे परिसरातील आंब्याचे मोठे नुकसान झाल्याचे भोगजी येथील शेतकऱ्यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतातील नांगरणी, मोगडणी आदी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. 

विजेचे खांब जमीनदोस्त, पत्रे उडाले 
वाशी (जि. उस्मानाबाद) : वादळी वाऱ्यामुळे सोलापूर-औरंगाबाद महामार्गावरील वाशी फाटा येथील पारधी पेढीवरील विजेचे तीन खांब जमीनदोस्त झाले. शहरातही काही घरांवरील पत्रे उडाले. तर उडालेले काही पत्रे रस्त्यावर पडले होते.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

परिसरात रविवारी सायंकाळी सव्वाचार ते पाचच्या दरम्यान विजेच्या कडकडाटात सुमारे पाऊणतास अवकाळी पाऊस झाला. काही वेळ गाराही पडल्या. परिसरात सध्या कांदा काढणीची कामे सुरू आहेत. काढलेला कांदा रानातच असल्याने हा कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी ताराबंळ उडाली. तर काही शेतकऱ्यांचा कांदा पावसाने भिजला. मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना गारव्यामुळे दिलासा मिळाला. 

केसरजवळगा परिसरात अवकाळी पाऊस 
केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह रविवारी (ता.१०) पहाटे तासभर जोरदार पाऊस झाला; मात्र पावसामुळे मुरूम व आलूर उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्हीच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाल्याने या दोन्ही उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या गावांचा वीजपुरवठा सुमारे नऊ तास खंडित झाल्याने परिसरातील नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, गावातील एका घरावर वीज कोसळली; मात्र सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. 

शनिवारी मध्यरात्री सुरू झालेला हा पाऊस रविवारी पहाटेपर्यंत सुरू असल्याने मुरूम व आलूर वीज उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्हीच्या मुख्य वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या दोन्ही वीज उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या जवळपास वीस गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सलग नऊ तास वीज गुल झाल्याने उकाड्यासह पाणीटंचाईचाही नागरिकांना सामना करावा लागला. यावेळी केसरजवळगा येथील रसूल बाशा इनामदार यांच्या घरावर वीज कोसळली; मात्र सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad rains hit mangoes