सीमेलगतच्या गावांचा रस्ता केला बंद

अविनाश काळे
Thursday, 26 March 2020

कर्नाटकच्या सीमेवरच्या डिग्गी गावाला कलबुर्गी जिल्ह्यातील होदलूर, कोतनहिप्परगा व नंदगूर गावाच्या सीमा जोडल्या आहेत. डिग्गी गाववासीयांनी याची दखल घेत स्वतः होऊन या तिन्ही गावांच्या सीमेवर दगड टाकून सीमाबंदी केली आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेले असतानाही अनेकांना संचारबंदीचे गांभीर्य समजत नाही. अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहन घेऊन फिरतानाचे चित्र दिसत आहे. उमरगा तालुक्याला कर्नाटक राज्याच्या सीमा जोडलेल्या आहेत, तर अन्य गावांच्याही सीमा गावाला जोडल्या गेल्या आहेत. राज्य सीमा बंद केल्याचे राज्य शासनाने जाहीर जरी केले असले तरी अंतर्गत असलेल्या मार्गाने अनेकजण राज्याच्या सीमा ओलांडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

हेही वाचा कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

तालुक्यातील डिग्गी हे कर्नाटक सीमेवरील गाव असून, गावची लोकसंख्या अंदाजे चार हजार आहे. कर्नाटकच्या सीमेवरच्या डिग्गी गावाला कलबुर्गी जिल्ह्यातील होदलूर, कोतनहिप्परगा व नंदगूर गावाच्या सीमा जोडल्या आहेत. डिग्गी गाववासीयांनी याची दखल घेत स्वतः होऊन या तिन्ही गावांच्या सीमेवर दगड टाकून सीमाबंदी केली आहे. ग्रामीण भागात पुणे, मुंबई, गुजरात व बेंगळूरुवरून येणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या आजाराविषयी अनेकजण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

शहरातून आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे असते, परंतु येथे असे होताना दिसत नाही. ग्रामीण भागात अन्य शहरांतून आलेल्यांची माहिती दडविली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्व गोष्टींचे गांभीर्य ओळखून उपाययोजना म्हणून गावकऱ्यांनी तिन्ही गावांच्या सीमा स्वतःहून बंद केल्या आहेत.

कोरोना विषाणूचे गांभीर्य वेळीच समजणे आवश्यक आहे. डिग्गी ग्रामस्थांनी केलेली उपाययोजना कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सुरक्षेसाठीचे पाऊल आहे. दरम्यान, तुरोरी, नागराळ येथील ग्रामस्थांनीही गावाअंतर्गत रस्त्यांवरून कर्नाटक राज्याला जाणारा रस्ता बंद केला आहे. 

 

डिग्गीला तीन गावांच्या सीमा जोडल्या आहेत. दहा किलोमीटरच्या अंतरात १२ गावे असून, दररोज या गावच्या नागरिकांचा संपर्क येत असतो. संसर्ग रोखण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. 
- रवींद्र गायकवाड, ग्रामस्थ, डिग्गी 

बाहेरगावावरून डिग्गी येथे दोनशे नागरिक आले आहेत. दोनचाकी व चारचाकी गाड्या असल्याने ये-जा करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डिग्गी व शेजारील कर्नाटक राज्यातील नागरिकांचा धोका होऊ शकतो. त्यामुळे गावकऱ्यांनी सीमा बंद करून वाहतूक रोखली आहे. 
- संतोष कवठे, ग्रामस्थ, डिग्गी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Roads Close To Border Towns Are Closed