क्वारंटाइन व्यक्तींनी उन्हाळ्यातही फुलवली शाळेतील बाग

जगदीश सुरवसे
शुक्रवार, 29 मे 2020

ज्या शाळेत शिक्षण घेऊन शहरात नोकरीसाठी गेले होते, ते कोरोनामुळे गावात परतले आहे. क्वारंटाइन केल्याने त्यांना पुन्हा शाळेचाच आधार मिळाला आहे. क्वारंटाइन नागरिकांनी श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबवून शाळेचा परिसर चकाचक केला आहे. 

अचलेर (जि. उस्मानाबाद) : परजिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना शाळेत क्वारंटाइन केले जात आहे. लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्याविकास हायस्कूलच्या परिसरात क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींनी संपूर्ण परिसराची स्वच्छता करीत वृक्षसंवर्धन करीत उन्हाळ्यातही बाग फुलवली आहे. 

लॉकडाउनमुळे बांधकाम, हॉटेल बंद असल्याने मजूर गावाकडे येत आहेत. सुरक्षिततेसाठी त्यांना गावातील शाळात चौदा दिवस क्वारंटाइन केले जात आहे. सध्या अचलेर येथील विद्याविकास हायस्कूल शाळेत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ६५ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर शेतामध्ये ७५ नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. तर चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने ८० व्यक्तींना घरी सोडण्यात आले.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

ज्या शाळेत शिक्षण घेऊन शहरात नोकरीसाठी गेले होते ते कोरोनामुळे गावात परतले असून, त्यांना क्वारंटाइन केल्याने पुन्हा शाळेचाच आधार मिळाला आहे. अशा काळातही शाळेची आपण सेवा केली पाहिजे म्हणून क्वारंटाइन व्यक्तींनी आपल्या शाळेप्रती असलेला अभिमान, प्रेम, जागृत करीत शाळेच्या सर्व परिसराची स्वच्छता केली.

शाळेतील वृक्षांचे संवर्धन करीत आळे करीत दररोज पाणी दिले जात असल्याने उन्हाळ्यातही झाडे बहरली आहेत. कोरोनाच्या भीतीने जनजीवन विस्कळित झाले असतानाही क्वारंटाइन नागरिकांनी श्रमदान करीत शाळा परिसर स्वच्छ करीत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे अचलेर व परिसरातील नागरिकांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान    

आमची शाळा, आमचा अभिमान 
आमची शाळा, आमचा अभिमान असे म्हणत क्वारंटाइन व्यक्तींनी स्वच्छता मोहीम राबवून शाळा परिसर चकाचक केला आहे. क्वारंटाइन व्यक्तींनी राबविलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक केले जात आहे. अचलेरचे ग्रामस्थही कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The school garden blossomed even in the summer by quarantine persons