esakal | गोंडस मुलाला पाहून ती झाली वेदनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लॉकडाऊनच्या काळात एका गरीब कुटुंबातील महिलेच्या मदतीसाठी सर्वांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले जात आहे. लक्ष्मी गोंडस मुलासह आपल्या घरी पोचली; मात्र तिला अन्‌ तिच्या चिमुकल्याला आता आपल्या वडिलांची प्रतीक्षा आहे. 

गोंडस मुलाला पाहून ती झाली वेदनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे नातेवाईक बारामतीत अडकले...घरात ८० वर्षीय आजीसोबत राहणारी गर्भवती माता प्रसूती वेदनेने विव्हळू लागली...नातीची अवस्था पाहून आजीची होणारी घालमेल पाहताच शेतमालकाने १०८ क्रमांकावर संपर्क साधला अन्‌ अवघ्या काही मिनिटांत आलेल्या रुग्णवाहिकेतून तिला उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले...उमरग्यातील स्थानिक लोकांनीही डॉक्टर्सना विनंती करीत मदत केल्याने वेळीच उपचार मिळाल्याने त्या महिलेने एका गोंडस मुलास जन्म दिला अन्‌ या गोड बातमीने कोरोनामुळे निर्माण झालेल्या दहशतीमध्येही तिला दिलासा मिळाला.

बेळंब (ता.लोहारा) येथील दानाप्पा सोनटक्के यांनी मुलगी लक्ष्मीचा विवाह गावातीलच यल्लाप्पा चेंडके या मुलासोबत वर्षभरापूर्वी लावून दिला होता. हातावरच पोट असल्याने दानाप्पा हा आई चंपाबाईला घेऊन बेळंब (ता. उमरगा) शिवारातील सुधीर चव्हाण यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला होता. तर मुलगी अन्‌ जावई पुणे येथे कामानिमित्त राहत होते. काही महिन्यांपूर्वी दानाप्पाही कामासाठी पुणे येथे गेला होता. तो मुलीकडेच राहत होता.

दरम्यान, दीड महिन्यापूर्वी त्यांनी मुलगी लक्ष्मीला प्रसूतीसाठी गावी बेळंबला पाठविले होते. तिच्या प्रसूतीसाठी दानाप्पा हे जावई यल्लाप्पा यास घेऊन पुण्याहून निघाले होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते दोघे बारामतीत अडकले. बुधवारी (ता. एक) रात्री लक्ष्मीला प्रसूती कळा सुरू झाल्या. नातीची वेदना पाहून वयोवृद्ध आजी चंपाबाई यांना काहीही सुचेना.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

याबाबची माहिती शेतमालक श्री. चव्हाण यांना मिळाली असता, त्यांनी तत्काळ १०८ क्रमांकावर संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटांत पोचलेल्या रुग्णवाहिकेतून लक्ष्मीला उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे पोचल्यानंतर कुणीही सोबत नसल्याने डॉक्टर्स नातेवाइकांबाबत विचारणा करीत होते. दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक महेश माशाळकर, महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पतगे हे रुग्णालयात आले. त्यांनी डॉक्टर्स, परिचारिकांना विनंती करीत सदर महिला एकटी असल्याचे सांगून उपचार तत्काळ सुरू करण्याची विनंती केली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने लक्ष्मीची प्रसूती नॉर्मल झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर लागणारे साहित्य श्री. पतगे यांनी घरातून आणून दिले; तसेच खाण्यापिण्याचे आवश्यक साहित्यही आणून दिले. गुरुवारी (ता. दोन) सकाळी एक नातेवाईक महिला रुग्णालयात आली. त्यानंतर शनिवारी (ता. चार) त्या महिलेसह बाळाला रुग्णालयाच्या वाहनातून गावाकडे पाठविण्यात आले. 

loading image