प्रत्येकाने दिले दहा रुपये, जमा झाले हजारो

नीळकंठ कांबळे
सोमवार, 6 एप्रिल 2020

लोहारा तालुक्यातील नागराळ येथील ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे.

लोहारा (जि. उस्मानाबाद) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मदत म्हणून तालुक्यातील नागराळ येथील ग्रामस्थांनी गावातील नागरिकांकडून प्रत्येकी दहा रुपयांप्रमाणे १० हजार २०४ रुपयांची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे.

शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर नागराळ हे ८८० लोकसंख्येचे गाव आहे. कुटुंबसंख्या २४६ इतकी आहे. गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात कामधंद्यासाठी पुणे, मुंबईसह अन्य शहरांत आहेत. सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने संचारबंदी करून सीमा सील करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- धक्कादायक घाटी रुग्णालयात ब्रदरला कोरोनाची लागण

राज्य सरकार अडचणीत असल्याने कोरोना विषाणूवर उपाययोजनेसाठी मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ या नावाने नवे बँक खाते सुरू करण्यात आले आहे. या खात्यात जनतेने सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नागराळ येथील ग्रामस्थांनी मदतीचा निर्णय घेतला.

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने दहा रुपये द्यावेत, असे आवाहन करताच नागरिकांनी स्वत:हून पैसे जमा केले. त्यानंतर गावातून फेरी काढण्यात आली. एकूण १० हजार २०४ रुपये जमा झाले. ही रक्कम सोमवारी (ता. सहा) तहसीलदार विजय अवधाने यांच्याकडे जमा केली जाणार आहे. सरपंच रितू कुलदीप गोरे, नारायण गोरे, पोलिस पाटील तानाजी माटे यांनी यासाठी पुढाकार घेतला. 

मोठी बातमी -  महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवायचा की नाही? राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत, म्हणालेत...

कानेगावच्या तरुणांकडून मदत 
कोरोना संसर्ग विषाणूवर उपाययोजनेसाठी तालुक्यातील कानेगाव येथील तरुणांनी मुख्यमंत्री सहायता निधीस १५ हजार १११ रुपयांचा मदतनिधी दिला आहे. 
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी अनेकजण आपापल्या परीने राज्य सरकारला आर्थिक बळ देत आहेत.

ग्रामीण भागातीलही तरुण आता आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत. कानेगाव येथील तरुणांनी एकत्र येत विधायक कामासाठी शिवराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. आपल्या श्रमातून मिळवलेला वाटा शिवराज्य प्रतिष्ठानकडे वळवला जातो. त्यातून गावातील अडचणीत असलेल्यांना मदत केली जाते. सध्या देशावर व राज्यावर कोरोनासारख्या महामारीचे संकट घोंगावत असल्याने राज्य सरकारला ‘फुल नाही, फुलाची पाकळी’ म्हणून शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने १५ हजार १११ रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस दिला आहे.

धीरज कदम, प्रदीप मडुळे, दत्ता मोरे, समाधान क्षीरसागर, भरत कदम, नागेश कदम, अंकुश तरमुडे, रोहित कदम, किशोर साबळे, प्रवीण सगर, राहुल कुलकर्णी, सूरज सय्यद, विक्की सूर्यवंशी, प्रसन्न कुलकर्णी, विक्रम कदम, नागनाथ कदम, प्रशांत कदम, कृष्णा क्षीरसागर, अण्णा आडसुळे, समाधान फताटे, अभिजित फताटे, पिंटू आडसुळे, चंद्रकांत लोभे, गणेश कदम, विठ्ठल भिसे या तरुणांनी निधी संकलनासाठी पुढाकार घेतला. 

 

मोठी बातमी -  महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवायचा की नाही? राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत, म्हणालेत...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Ten rupees each, thousands accumulated