ते चिमुकले तीन दिवसांपासून उपाशीपोटी

दिलीप गंभिरे
रविवार, 29 मार्च 2020

जालना जिल्ह्यातील शेवली येथील हे ऊसतोड मजूर असून, कोल्हापूर येथील शाहू कारखाना येथे ऊसतोडीचे काम करण्यासाठी गेले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कारखाना बंद झाल्याने ते जालना येथे परतत होते.

कळंब (जि. उस्मानाबाद) : जालना जिल्ह्यातील शेवली येथील २० मजूर शहरातून केज रस्त्याने गावाकडे जात असताना रविवारी (ता. २९) पोलिसांनी पकडून त्यांना येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत ठेवले आहे. यात महिला व चिमुकल्यांचा समावेश असून, गेली तीन दिवस उपाशीपोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

जालना जिल्ह्यातील शेवली येथील हे ऊसतोड मजूर असून, कोल्हापूर येथील शाहू कारखाना येथे ऊसतोडीचे काम करण्यासाठी गेले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कारखाना बंद झाल्याने ते जालना येथे परतत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. तसेच अद्याप तरी प्रशासनाकडून त्यांच्या खाण्यापिण्याची कुठलीही सोय करण्यात आलेली नाही.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची ही सोय केली आहे. याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला असता, त्यांच्या जेवणाची सोय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ऊसतोड कामगारांना आपल्या घराची ओढ लागणे साहजिक आहेच; मात्र दुसरीकडे ऊसतोडणी कामगारांना कारखान्यावरच ठेवा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असले तरी हे कारखानदार अजूनही या ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी पाठवून देत आहेत. जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे असताना कोल्हापूरमधून निघालेले हे कामगार कोल्हापूर जिल्ह्यातील सीमा पार करून सोलापूर आणि सोलापूरची सीमा पार करून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पोचलेच कसे, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

चिमुकल्याचा समावेश 
जालना जिल्ह्यातील हे सर्व कुटुंबीय आपल्या मुलाबाळासह कोल्हापूर येथील शाहू कारखान्याकडे ऊसतोडणी करण्याच्या कामाला गेले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून, सीमाबंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गावाकडे कसे परतावे, असा मोठा प्रश्न बाहेर मजुरीसाठी गेलेल्या मजुरांसमोर आहे. यामध्ये लहान चिमुकल्यांचा मोठा समावेश असून, त्यांच्याकडे पाहून रडू कोसळल्याशिवाय राहणार नाही. 
दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांनी सांगितले, की जालना जिल्ह्यातील हे मजूर शहरातून केज रस्त्याने पिकमधून जात होते. त्यांना पकडून शाळेत ठेवण्यात आले असून, त्यांना मुक्त करण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad They Were Hungry For Three Days