तपासणीच्या धाकाने युवक उसाच्या फडात

सयाजी शेळके
बुधवार, 25 मार्च 2020

गावकऱ्यांच्या संशयी वृत्तीने परजिल्ह्यातून गावात आलेल्या एका युवकाला उसाच्या फडात लपण्याची वेळ आली. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वाहन, डॉक्टर्स पाठवून त्याला ताब्यात घेत तपासणी केली. 

उस्मानाबाद : जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांत परजिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ३५ हजारांवर आहे. कोरोनाच्या भीतीने गावाकडे परतलेल्या अशा नागरिकांना ग्रामस्थ मात्र सक्तीने तपासणी करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या एका युवकावर तर चक्क उसाच्या फडात लपून बसण्याची वेळ आली.

दरम्यान, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोजचा ओपीडीचा आकडा सरासरी ४० ते ५० असताना गेल्या चार दिवसांपासून दररोज १५० ते २०० जणांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे असतील तरच नागरिकांनी तपासणी करावी, अन्यथा घरामध्येच बसून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, पुणे अशा भागांत वाढत असताना ग्रामीण भागात बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावर नोंद करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी नोंदी केल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी (ता. २०) बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांची संख्या दोन हजार ८९८ एवढी होती.

त्यानंतर शनिवारी (ता. २१) पुन्हा पाच हजार ५३९ नागरिक नव्याने आले. रविवारी (ता. २०) पाच हजार ९४४, सोमवारी (ता. २३) ११ हजार ५९९, तर मंगळवारी (ता. २२४) नऊ हजार ५६६ नागरिक बाहेरच्या जिल्ह्यांतून उस्मानाबादच्या ग्रामीण भागात आले आहेत. अधिकृत नोंदणी झालेला हे आकडे आहेत. नोंदणी न झालेल्यांची संख्याही तेवढीच आहे. म्हणजे एक लाखाच्या जवळपास नागरिक बाहेरच्या जिल्ह्यांतून आले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

ओपीडी तिपटीने वाढली 
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेची ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रात सरासरी दररोजची ओपीडी (तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या) ४० ते ५० होती. दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ओपीडी तब्बल १५० ते २०० पर्यंत गेली आहे. बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. गावकरी बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांना सक्तीने तपासणी करण्याचा आग्रह करीत आहेत. विशेष म्हणजे अनेकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे नसतानाही तपासणी करून घेण्याची सक्ती करीत आहेत. शिवाय तशा तक्रारीही येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण येत आहे. 

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

उसात लपला युवक 
बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एका युवकाला सर्दी झाली होती. गावकऱ्यांनी त्याला तपासणी करून घेण्याचे आवाहन केले; मात्र तो परदेशी व्यक्ती अथवा त्यांच्या नातेवाइकांच्या संपर्कात आलेला नसल्याने तपासणी करण्यास टाळाटाळ करीत होता. ग्रामस्थांनी मात्र त्याला जबरदस्तीने तपासणी करण्याचा आग्रह केला. ग्रामस्थांचा पवित्रा ओळखून अखेर तो गावालगतच्या उसाच्या शेतात लपून बसला. त्याच वेळी गावातील एकाने ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली.

कोरोनाची लक्षणे असलेला युवक शेतात लपून बसल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची धावपळ उडाली. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वाहन, डॉक्टर्स पाठवून त्याला ताब्यात घेत तपासणी केली. त्याला कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. शिवाय तो कोणाच्याही संपर्कात आलेला नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गावकऱ्यांच्या संशयी वृत्तीने मोठा खेळ रंगल्याची चर्चा यामुळे जिल्‍ह्यात सुरू झाली आहे. वास्तविक बाहेरच्या जिल्ह्यातील असला, तरी त्याने गावातील घरातच थांबणे अपेक्षित आहे. गरज नसताना तपासणी करण्याची सक्ती करणे चुकीचे असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 

 

बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येकाने तपासणी करणे गरजेचे नाही. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे नसतील तर तपासणी करण्याची अजिबात गरज नाही. अशी लक्षणे असली, तरी त्याच्या प्रवासाची माहिती घेतली जाते. जर तो कोणत्याही परदेशी व्यक्ती, नातेवाइकांच्या संपर्कात नसेल तर त्याने १४ दिवस घरातच थांबणे गरजेचे आहे. विनाकारण तपासणी करून काम वाढवू नये. काही ठिकाणी वाळीत टाकण्यासारखे प्रकार घडत असल्याचे दिसत आहेत. माणुसकी जपून सर्वांनी या संकटाला तोंड देणे गरजेचे आहे. 
- डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Youth In Fear Of Investigation