राजकीय धूळवडीपेक्षा मदतीची अपेक्षा, उमरगा तालूक्यात 23 हजार हेक्टरवरील पंचनामे 

00Umarga madat.jpg
00Umarga madat.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीतील पिकाच्या पाहणीसाठी सत्ताधारी-विरोधकांकडुन आरोप-प्रत्यारोप होत आहे. एकीकडे राजकीय धूळवडीत आर्थिक मदत मिळण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत तर दुसरीकडे कृषी, महसूल विभागाचे कर्मचारी व ग्रामसेवक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी रानात चिखल तुटवड फिरताहेत. दरम्यान उमरगा तालुक्यातील एकुण अंदाजित नुकसानीचे क्षेत्र ४१ हजार ५१० हेक्टर आहे, त्यापैकी आत्तापर्यंत २३ हजार हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरीत पंचनामे गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत.
 

उमरगा तालुक्यात १३ ऑक्टोबरच्या रात्रीपासुन १४ ऑक्टोबरला सकाळी नऊपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने संपूर्ण तालुका जलमय झाला होता. अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटुन शिवार जलमय झाले. बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या परिश्रमातून सोयाबीनची काढणी गंजी उभारल्या होत्या मात्र त्या आता पाण्यात अडकल्या आहेत. ओढे, नदी काठच्या शेतातील सोयाबीनच्या अख्या गंजी  नदीपात्रातील पाण्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत तरंगत गेल्या. अनेक ठिकाणी गंजीत पाणी शिरल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊसाची स्थितीही भयावह आहे, ऊसाच्या अनेक क्षेत्रात पाणी साचले आहे. जमिनीची मातीही वाहून गेल्याने सोनं पिकविणाऱ्या क्षेत्रात खडक, दगडांचा खच पडला आहे. दरम्यान पिकाबरोबरच पिकच वाहून गेल्याने ओल्या जखमांच्या वेदनांनी शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान कांही मोजक्या सूरक्षित असलेल्या सोयाबीनच्या राशी करण्याचे काम सुरू असताना मंगळवारी (ता.२०) पावसाने त्यात विघ्न आणले.

२३ हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण

शेतीतील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कृषी, महसूल विभागाचे कर्मचारी व ग्रामसेवक यांनी पंचनाम्याला सुरुवात केली. कृषी विभागाने अंदाजित प्राथमिक अहवालात ४१ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावरील ५५ हजार ९६८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती कळविली आहे. त्यात सर्वाधिक ३२ हजार हेक्टर नुकसान सोयाबीनचे, पाच ते सहा हजार तुरीचे, दिड हजार ऊसाचे तर जवळपास दोन हजार हेक्टर बागायतीचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत २६ हजार शेतकऱ्यांचे २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. दरम्यान नऊ हजार ७४१ शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाईनद्वारे नुकसानीची तक्रार नोंदवली आहे तर २१४ शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली आहे.

आश्वासनावरच केली जातेय बोळवण ! 

पिकांसह शेतीतील माती वाहुन गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राजकीय मंडळींकडून पाहणी केली जातेय. मात्र आरोप - प्रत्यारोप, आर्थिक समस्यांचे गऱ्हाणे केले जातेय. मात्र आर्थिक नुकसानीत भरडलेल्या शेतकऱ्यांसाठी ठोस मदतीची घोषणा केली जात नाही. राजकीय द्वेष बाजूला सारून मदतीसाठी राज्य - केंद्र सरकारवर जबाबदारीची विधाने आता बस्स झाली. प्रसंगी कर्ज काढा आणि भरीव मदतीची घोषणा व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com