कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त; मशाल घेऊन राज्यात फिरणार : पंकजा मुंडे

दत्ता देशमुख
Thursday, 12 December 2019

गोपीनाथ मुंडेच्या रक्तात बेईमानी नाही. पक्ष कोणा एकाचा नसतो, ती सतत बदलणारी प्रकिया आहे. तो कोणा एकाचा नाही.  पक्ष रिव्हर्स गिअर मध्ये नेऊ नका असे सांगत मी पक्ष सोडणार नाही, पक्षाने मला सोडावे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

परळी (जि. बीड) : बंड केले नसते, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे, एकनाथ खडसे व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन दौरा काढणार आहोत, मी कोअर कमिटीतून मुक्त होत आहे, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.

परळी परिसरातील पांगरी येथील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अभिवादन कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, अतुल सावे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, सुरजितसिंह ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, रमेश आडसकर, रमेश पाकळे, सविता गोल्हार आदींची उपस्थिती होती.

पोलिसाचा दंडुका हातात घेऊन पंकजा...

पराभवानंतर तब्बल दीड महिन्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या पंकजा मुंडे काय बोलतात, याकडे लक्ष लागले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली बेधडक भूमिका आणि भावना व्यक्त केल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, ''मी कुठेही जावून काहीही होवू शकते. पण तसे करणार नाही. मला ते शोभणार नाही. मी एक समाजातील एक घटक आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडेंना निधनानंतरही लोक आदराने बोलतात. त्या मर्दाची मी मुलगी आहे. पराभवाने खचणारी पंकजा मुंडे नाही. माझी जनतेशी जोडलेली नाळ कोणी तोडणार नाही.''

फक्त मुंडे स्मारकासाठीच फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

१२ दिवस संजय राऊत यांच्यानंतर मीच टीव्हीवर असल्याची किमया गोपीनाथ मुंडेंचीच असल्याचेही त्यांनी नमूद केले. माझा आवाज दाबू नका असे आवाहन करत देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी शपथ घेतली तेंव्हा सूत्र कुठे होते, असा सवालही त्यांनी केला. झोपेतून डोळे चोळत उठल्यानंतरच कळाले यांनी शपथ घेतली, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. 

माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू

गोपीनाथ मुंडेंनी भाजपमध्ये शेवटचा श्वास घेतला. आपण घरच्या भाकरी बांधून संघर्ष यात्रा काढली, पक्षाकडून दमडीही घेतली नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर झालेला असतानाही आपण तेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी एकेक आमदार निवडुन आणण्यासाठी काम केले. मग मी बंड का करणार, असा सवाल करत ह्या वावड्या उठविल्या जात असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आपण शेवटच्या क्षणापर्यंत काम केले.

खडसेंनी अशी केली फडणविसांची धो-धो धुलाई

राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष व नंतर मी या तत्वाने जगले. पडल्यावर पण पक्ष सोडणार अशा अफवा कोणी सोडल्या याची चौकशी करा, असे आवाहन त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केले. याचे उत्तरही पक्षाने द्यावे असे आवाहन करत आपण आमदार, विरोधी पक्षनेते होण्यासाठी मी दबाव आणला असे म्हणणे चुकीचे आहे. गोपीनाथ मुंडेच्या रक्तात बेईमानी नाही. पक्ष कोणा एकाचा नसतो, सतत बदलणारी प्रकिया आहे. पक्ष रिव्हर्स गिअर मध्ये नेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. आपण कोर कमिटीच्या जबाबदारीतुन आज मुक्त होत आहोत, मी आता कोणीच नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde Out From BJP Core Committee