महादेव जानकरांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये

ई सकाळ टीम
Monday, 26 October 2020

माझे बुंध महादेव जानकर येथे उपस्थित आहेत. त्यांच्याशिवाय माझा कुठलाही कार्यक्रम कधी पूर्ण होत नाही. आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

बीड : माझे बुंध महादेव जानकर येथे उपस्थित आहेत. त्यांच्याशिवाय माझा कुठलाही कार्यक्रम कधी पूर्ण होत नाही. आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे रविवारी (ता.२५) झालेल्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.

 

मुंडे म्हणाल्या, की मी राजकारण सोडले, घरात बसले असा अपप्रचार झाला. मात्र मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अभिमन्यूला अर्धज्ञान असल्याने तो चक्रव्यूहात अडकला. मात्र मला चक्रव्यूह भेदता येतो. एक दिवस हा मेळावा शिवतीर्थावर घेऊन मैदान भरवून दाखवू, असा हल्लाबोल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला. यावेळी खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदड, केशव आंधळे, राहुल केंद्रे आदी उपस्थित होते.

 

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

ऊसतोड मजूर संपावरूनही हल्लाबोल
ऊसतोडणी कामगारांच्या संघटना आपल्यासोबतच असून दोन बैठकांत मिटणारा प्रश्न दोन महिने का लांबला? मुंबईत बसून निर्णय होत नाहीत तर ढाब्यावर बसून होतात का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत चर्चा झाली असून पुढेही करू. ऊसतोड कामगारांच्या घामाची जाण आहे. लाचारी नको, स्वाभिमान म्हणून ऊसतोडणीस जा, असे मी मजुरांना सांगितले. लोक बैठकीनंतर बघू म्हणतात. तुमचा आकडा सांगा, पक्षाचे पत्रक काढून, दौरा करून काय झाले, असा सवालही त्यांनी नाव न घेता पक्षविरोधकांना केला. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांना यूपीत पाठवू, असा टोलाही त्यांनी लगावला. तुमच्या २७ तारखेच्या बैठकीनंतर मी काय ते ठरवीन, असा इशाराही दिला.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde Said My Brother Mahadev Jankar Is Here Beed News