उस्मानाबादच्या बहीणभावांना मनोभावे विनंती : त्या दुकानांकडे पाठ फिरवा

Osmanabad News
Osmanabad News

उस्मानाबाद : सध्या तरी उस्मानाबाद ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना किराणा आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी काहीशी सूट मिळणार आहे. दारूची दुकानेही सुरू झाली आहेत. त्या ठिकाणीही लोक गर्दी करतील आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल. त्यामुळे ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी उस्मानाबादकरांना हात जोडून कळकळीची विनंती केली आहे. 

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सोमवारी (ता. चार) लॉकडाऊनच्या वेळात देण्यात येणाऱ्या सवलतीबाबतचे आदेश जारी केले. यात नागरिकांना किराणा आणि भाजीपाला घेण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस केवळ पाच तास परवानगी देण्यात आली आहे. या वेळेतही लोक गर्दी करतील आणि जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, या भीतीने लोकांना सावध करण्यासाठी श्री. सुराणा यांनी जाहीर पत्र लिहिले आहे. 

या पत्रात ते म्हणतात, की जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना महामारीला आपल्या जिल्ह्यात हातपाय पसरू न देण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण काम जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. लॉकडाऊन असलेले उद्योग-व्यवसाय-व्यापार टप्प्याटप्प्याने पहिल्यासारखा चालू व्हावा, यासाठी त्यांनी सावधपणे दुकाने चालू ठेवण्याच्या वेळेबाबत आदेश काढले आहेत. आपण सर्व नागरिकांनी शिस्तीचे पालन केले, नियम पाळले, तर सर्वांनाच फायदा होणार आहे. 

आपल्या पत्रात पन्नालाल सुराणा यांनी लिहिले आहे, की रेटारेटी करायची नाही हे काही इतके अवघड नाही. तरुणांना दुचाक्यांवरून फेऱ्या मारण्याचा थरार अनुभवावासा वाटतो. पण त्यांनीही हे जरा सबुरीने घ्यावे. दारू पिणे किती वाईट आहे, हे नव्याने कुणी सांगायला पाहिजे का? आपल्या मायबहिणी व कारभारणी याचे अंतरीचे बोल त्या सर्व भावांनी कान देऊन ऐकावे व त्या दुकानांकडे पाठ फिरवावी, असे माझे कळकळीचे आवाहन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com