बिबट्याचा दोनदा गृहप्रवेश, आठ तास असा चालला थरार

Panther Came to House in Aurangabad
Panther Came to House in Aurangabad

औरंगाबाद - बिबट्या घुसल्याने अख्खा एन- वन परिसरच भयभीत झाला. काही काळ बिबट्या रस्त्यावरही वावरल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. एन- वनचे उद्यान आणि हनुमान मंदिर इथेही मुक्‍तसंचार केला. यात खास बाब ठरली बिबट्याचा दोनदा गृहप्रवेश. आठ तासांच्या कालावधीत बिबट्याने दोन्ही घरांत दोनदा प्रवेश केला. क्षणिक नव्हे, तर तासाहून अधिक काळ त्याने इथेच घालवला. चांगली बाब म्हणजे, दोन्ही घरांत कुणीही राहत नव्हते. 

बिबट्या सगळ्यात पहिल्यांदा सकाळी सहा वाजता प्रमोद नाईक यांच्या बंगल्याच्या आवारात दिसला. तिथून उद्यान, हनुमान मंदिर परिसरातून येत सकाळी सात वाजता डॉ. तोष्णीवाल यांच्या मालकीच्या जागेत प्रवेश केला. तिथून बिबट्याने उद्यानात उडी टाकली. यादरम्यान, गणपती मंदिर आणि साकोळकर हॉस्पिटलमध्ये असलेल्या एन- वन उद्यानाच्या गेटवर (पूर्वीचे
मेन गेट) धडक दिली. साधारणत: सकाळी सातची वेळ होती. या ठिकाणी उभ्या असलेल्या भाजीवाल्याची धावपळ झाली. त्यानंतर मागे जात पुन्हा नाईक यांच्या बंगल्याच्या परिसरात उडी टाकली. सुमारे साडेआठ वाजेपासून ते तब्बल साडेअकरा वाजेपर्यंत बिबट्या याच परिसरात होता. सकाळी सहा वाजता निघालेला बिबट्या नाईक यांच्या घरात साडेआठ वाजता
परतला. 

वनविभागाच्या कारवाईला सकाळी अकरा वाजता सुरवात झाली. त्यानंतर दुपारी सव्वाबाराला बिबट्या पुन्हा उद्यानात गेला. काहीकाळ सैरभर झालेल्या बिबट्याने पुन्हा डॉ. तोष्णीवाल यांच्या मालकीच्या रिकाम्या जागेत प्रवेश केला. या ठिकाणी असलेल्या पडक्‍या घरात बिबट्या बसला. सकाळी सात वाजता याच परिसरातून गेलेला बिबट्या पुन्हा सव्वाबारा वाजता
त्याच परिसरात आला. तिथेच त्याला पकडण्यात वनअधिकाऱ्यांना यश आले. यामुळे दोन घरे आणि दोनदा वावर या बाबी लक्षवेधी आहेत. 
 

ना हल्ला, ना जीवितहानी 

उच्चभ्रू वसाहत असल्याने दिवसभरात या ठिकाणी माणूस बाहेर चालता-फिरता दिसणे ही दूरची गोष्ट असते; मात्र मॉर्निंग वॉकनिमित्त सकाळी गर्दी असतेच. दोन घरे आणि मंदिर उद्यानाशिवाय बिबट्या तब्बल एक तास इतरत्र वावरत होता. बिबट्या माझ्यासमोरून गेला, असे सांगणाऱ्यांची संख्या मोठी होती. बिबट्या समोर दिसल्याने अनेकांची घाबरगुंडी
झाली. विशेष म्हणजे, त्या बिबट्याने कुणालाही शारीरिक दुखापत केली नाही. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास बिबट्या उद्यानातून पोलिसांवर आणि नागरिकांवर धावून आला खरा; मात्र तो तडक डॉ. तोष्णीवाल यांच्या मालकीच्या जागेत गेला आणि वनविभागाच्या तावडीत सापडला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com