चर्चा फिस्कटली : कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हटाव

हरी तुगावकर
बुधवार, 29 जानेवारी 2020

  • कुलगुरुंसोबतची चर्चा फिसकटली
  • विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच

लातूर : येथील कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना हटवावे या मागणीकडे कुलगुरुंनी दुर्लक्ष केले. त्यांच्यासोबत झालेली चर्चाही फिसकटली. त्यामुळे तिसऱया दिवशीही महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी आपले ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले.

बुधवारी रात्रीही हे विद्यार्थी थंडीतच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच झोपून राहिले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बदली करावी अशी या विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली आहे. दुसऱया मागण्या सांगण्यासही या विद्यार्थ्यांनी नकार दिला आहे.

गेल्या सोमवारपासून (ता. २७) या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेली तीन दिवस या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनासोबत चर्चा करण्यास नकार दिला होता.

हेही वाचा - याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

परभणी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंनीच यावे व आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली होती. त्यामुळे मंगळवारी विद्यापीठाच्या आलेल्या पथकालाही हात हलवत परत जावे लागले होते.

थंडीत कुडकुडत झोपले

गेली दोन दिवस विद्यार्थी, विद्यार्थीनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच थंडीत कुडकुडत झोपले होते. अखेर बुधवारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण येथे आले. त्यांनी या विद्यार्थ्यांसोबत प्रवेशद्वारावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यांना सभागृहात बोलावण्यात आले. दोन तास चर्चा केली.

हेही वाचा - चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

पहिल्यांदा महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांची बदली करा अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानंतरच दुसऱया मागण्या आम्ही मांडू असे त्यांनी कुलगुरुंना सांगितले. ही प्रशासकीय बाब असल्याने थोडा वेळ लागले आपण आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती श्री. ढवण यांनी या विद्यार्थ्यांना केली. पण विद्यार्थ्यांनी त्यांची विनंती फेटाळली. चर्चा फिसकटल्याने अखेर श्री. ढवण परत निघून गेले. विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Agriculture University Students Protest News