परभणी : दुध दरवाढीसाठी भाजपचे जिल्हाभर आंदोलन

गणेश पांडे
Saturday, 1 August 2020

भाजपा महायुतीच्या वतीने परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्तारोको धरणे आंदोलने करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला

परभणी-  कोरोना संकटात अडचणीत सापडलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे, दुध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दुध खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर करावा या मागणीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्तारोको धरणे आंदोलने करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

भाजपचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरातील उड्डाण पुलावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोकिंद खिल्लारे, मधुकर गव्हाणे,मोहन कुलकर्णी,भाजपा पदाधिकारी संजय शेळके,संजय रिझवाणी,भीमराव वायवळ,दिनेश नरवाडकर,विजय गायकवाड, सुरेश भुमरे,अतिक पटेल,प्रदिप तांदळे, रामदास पवार,भालचंद्र गोरे,अँड.गणेश जाधव,आकाश लोहट,बाळासाहेब साबळे,संतोष जाधव,रोहित जगदाळे,आकाश पवार,आनंता गिरी,राहुल संघई,निरज बुचाले,राहुल शिंदे,विनायक कातकडे,आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा  नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळांचा वाढला निकाल,

13 ठिकाणी  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले 

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा ग्रामीण शाखेच्यावतीने तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या गावात जोरदार आंदोलने केली.  पाथरी, मानवत, ताडकळस,झिरो फाटा, कावलगाव, झरी, जिंतूर,सेलू, गंगाखेड पालम,सोनपेठ सिंगनापुब फाटा,जिंतुर ,सेलु या 13 ठिकाणी  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब जामगे, जिंतूर सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर भाजपचे पाचही जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या नव्यानंच जबाबदारी सोपवलेले सर्व पदाधिकारी मोर्चाचे अध्यक्ष आघाड्यांचे संयोजकांनी सहभाग घेतला. ताडकळस ते धारा फाटा आणि गंगाखेड येथे तर शेतकऱ्यांनी या आंदोलनात प्रचंड प्रतिसाद दिला. ताडकळस या ठिकाणी ४०० शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. 13 ठिकाणी मिळून १३०० कार्यकर्त्यांचा सहभाग नोंदविला.

या होत्या मागण्या

- दुधाला  किमान प्रतिलिटर 30 रुपयांप्रमाणे भाव द्या

- दुधाला प्रति लिटर २० रुपये अनुदान द्या

- दूध बुक तिला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्या

राज्यातील तसेच परभणी जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील भाजप सरकारच्या काळात दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर प्रमाणे ३२ रुपये दर मिळत होता. आता हाच भाव प्रति लिटर फक्त २२ रुपये मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मागील भाजप सरकार प्रमाणे महाविकास आघाडीच्या सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान व दरवाढ देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- आनंद भरोसे, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप

राज्यातील दुधउत्पादक शेतकरी अडचणी सापडण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारने  केले आहे. या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या तातडीने सरकारने मंजूर कराव्यात यासाठी आजचे हे आंदोलन छेडण्यात आले होते. जिल्ह्याच्या तालुका ठिकाणासह ग्रामीण भागातूनही आंदोलनाचा चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या मनातील खदखद या आंदोलनाच्या रुपाने बाहेर पडली.

- डॉ. सुभाष कदम, जिल्हाध्यक्ष, ग्रामीण भाजप

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: BJP's district-wide agitation for milk price hike parbhani news