परभणी : सरकारच्या निषेधार्थ भाजपचे झुणका भाकर खावून धरणे

गणेश पांडे
Friday, 13 November 2020

भाजप किसान मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

परभणी ः अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दमडीची ही मदत न करता गोड दिवाळी कडू करण्याचे पाप राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.13) धरणे आंदोलन करण्यात आले. ऐन दिवाळीत सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बसूनच झुणका भाकर खाल्ली तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही झुणका भाकर देवून निषेध व्यक्त केला.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद व कापूस हे हाती आलेले पीक अतिवृष्टीमुळे उध्दवस्त झाले आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्यावतीने जिल्हाभरात आर्थिक नुकसानीची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारकडे वारंवार मदतीसाठी निवेदने देण्यात आली. परंतू असे असतांनाही जिल्ह्यातील 16 महसुल मंडळांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या मुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यामध्ये असंतोष पसरला आहे. त्याच बरोबर दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून आर्थिक मदत करू अश्या घोषणा सरकार तर्फे करण्यात आल्या, परंतू प्रत्यक्षात दिवाळी आली तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी कडू केली आहे असा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. या निषेधार्थ भाजप किसान मोर्चाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उध्दवराव नाईक, प्रमोद वाकोडकर, बाळासाहेब भालेराव, सुभाषराव आंबट, रंगनाथराव सोळंके, बाळासाहेब जाधव, विठ्ठलराव रबदडे, गोपाळराव डुकरे, सुरेश भुमरे, राजेश देशमुख, आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा विशेष रेल्वे बंद करण्याचा घातला घाट, प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली झुणका भाकर भाजप किसान मोर्चाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात बसलेल्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह पदाधिकारी व किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदन सादर केले. निवेदनासोबत त्यांनी त्यांना झुणका भाकर भेट दिली. यामुळे श्री. वडदकर हे देखील काही वेळासाठी स्तब्ध झाले.

भाजप अजूनही आंदोलनाची मालिका सुरुच ठेवणार

शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करण्याकरिता पैसे नाहीत. अशा वाईट परिस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी दिवाळीची गोड - धोड करून सण साजरा करू शकत नसेल तर शेतकऱ्यांची गोड दिवाळी कडू करणाऱ्या राज्य शासनाच्या धोरणाचा मी निषेध करते. राज्य शासनाने तातडीने शेतकऱ्याना आर्थिक मदत दिली पाहिजे अन्यथा भाजप अजूनही आंदोलनाची मालिका सुरुच ठेवणार आहे.

- मेघना बोर्डीकर, आमदार, भाजप

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: BJP's Zhunka bhakar to protest against the government parbhani news