परभणी ; थॅलेसिमीयाचे रुग्ण रक्त तुटवड्याने त्रस्त

सकाळ वृतसेवा 
Wednesday, 14 October 2020

कोरोना संसर्गाचा रक्तदान शिबिरांसह रक्त संकलनावर देखील परिणाम झाल्याचे दिसून येते. स्वेच्छा रक्तदात्यांची संख्या मोठी आहे. परंतू, कोरोनामुळे ते धजावत नसल्याचे दिसून येते. परिणामी, शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.   

परभणी ः जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. अगोदरच कोरोना संसर्गामुळे रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पुढे येत नसतांना रक्तदान शिबिरांना देखील परवानगी मिळत नसल्याची माहिती असून त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

कोरोना संसर्गाचा रक्तदान शिबिरांसह रक्त संकलनावर देखील परिणाम झाल्याचे दिसून येते. स्वेच्छा रक्तदात्यांची संख्या मोठी आहे. परंतू, कोरोनामुळे ते धजावत नसल्याचे दिसून येते. तसेच रक्तदान शिबीरे घेणाऱ्या संस्था, कार्यकत्यांची संख्या देखील अधिक आहे. दोन-तीन महिण्यापुर्वी अनेक सेवाभावी संस्थांनी कोरोनाच्या काळातही रक्तदान शिबीरे घेतल्याने अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. परंतू, सद्यस्थितीत मात्र रक्तपेढीत प्रचंड तुटवडा निर्माण झाला. या रक्तपेढीला दररोज किमान ३५-४० रक्तपिशव्यांचा पुरवठा करावाच लागतो. परंतू, सद्यस्थितीत तर रक्तपेढीत फक्त ५० ते ६० रक्तपिशव्या असून त्यासाठी देखील प्रचंड वाद निर्माण होत असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल , बुधवारी २५३ कोरोनामुक्त ः ९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह -

थॅलेसेमिया रुग्णांचे प्रचंड हाल 
जिल्ह्यात थॅलेसिमीया आजार असलेल्या रुग्णांची संख्या दोनशे आहे. दर महिण्याला त्यांना किमान दोन रक्तपिशव्या द्याव्याच लागतात. त्यातच बहुतांश रुग्ण हे अतिशय गरीब कुटूंबातील असल्यामुळे त्यांना खासगी रक्तपेढीमध्ये तर जाणे शक्यच नाही. त्यांना शासकीय रक्तपेढीचाच आधार असून त्यांच्यासाठी देखील रक्तपुरवठा करणे शक्य होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक पालक रक्तासाठी गयावया करीत आहेत, रडत आहेत. परंतू, रक्तसाठाच नसल्यामुळे रुग्णालय प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसून येते. ज्यांना अधिक गरज अशा चार-दोन जणांना आहे त्या साठ्यातून रक्त दिल्या जात आहे. 

हेही वाचा - परभणीच्या झरीमध्ये स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी उभारतेय चळवळ

शिबिरांना परवानगी नसल्याचा परिणाम 
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सोमवारी (ता.१२) सर्व जिल्ह्यातील रक्तकेंद्र प्रमुखांना सार्वजनिक नवरात्रोत्सवात रक्तदान शिबीरे आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. मंडळांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांना रक्तदान शिबिरांसाठी प्रेरीत करावे, असेही त्या पत्रात म्हटले आहे. परंतू, येथे मात्र रक्तदान शिबिरांनाच परवानगी नाकारल्या जात असल्याची माहिती आहे. नुकतेच एका संस्थेने रक्तदान शिबिर घेऊन किमान ५० बॅग रक्त संकलन केले जाणार असल्याचे पत्र जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिले होते. एका खासगी हॉटेल देखील त्यासाठी आरक्षित केले होते. कोरोनाचे सर्व सुरक्षा नियम पाळून शिबिर घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कलम १४४ च्या नावाखाली त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे रक्ताचा हा तुटवडा तत्काळ भरून निघाला नाही, तर जीवीतहाणी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani; Patients with thalassemia suffer from anemia, Parbhani News