परभणीला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले,चार मंडळात अतिवृष्टी

फोटो
फोटो

परभणी : मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी (ता. १०) च्या मध्यरात्री जिल्ह्याला तुफानी पध्दतीने झोडपुन काढले आहे. चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून परभणी शहरात सर्वाधीक ८५ मिलीमिटर पाऊस पडल्याने शहराच्या भोवताली असणाऱ्या सर्वच नाल्यांना पूर आला आहे. दरम्याण धार रस्त्यावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहु लागल्याने १२ गावांचा संपर्क दुपारपर्यंत तुटलेला होता. तर गंगाखेड रस्त्यावरील नविन पुलाच्या जवळील रस्त्यावरुन पाणीवाहु लागल्याने वाहतुक काही वेळासाठी  ठप्प झाली होती. जिल्ह्यात २४ तासात एकुण ३३. ६५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसाची चांगलीच सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ता. ३१ मे ते तीन जून दरम्यान जिल्हाभरात जोरदार पाऊस झाल्यानंतर चार ते पाच दिवस दमट वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी (ता. १०) उकाड्यात मोठी वाढ झाली होती. दुपारनंतर अनेक भागात वादळी वारे सुरु होऊन पाऊस देखील पडला. सायंकाळी पुन्हा वारे सुरु झाले. रात्री नऊच्या सुमारास परभणी शहरासह सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही तासात रिमझिम स्वरुपाचा पाऊस होता. रात्री एक वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तीन तास तुफानी बॅटींग करत पावसाने धोधो हजेरी लावत झोडपुन काढले.

परभणी शहरातील रस्ते जलमय

शहरासह परिसरात गुरुवारी (ता. ११) सकाळी आठवाजेपर्यंत जवळपास ८५ मिलीमिटर मुसळधार पाऊस  झाला. मध्यरात्रीनंतर सुरु झालेल्या पावसाचा जोर पहाटे चारपर्यंत कायम होता. पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे शहराच्या अनेक भागातील, विशेषतः नव्या वसाहतींमध्ये हजारो नागरीकांनी रात्र जागून काढली. चिद्रवारनगर, सदगुरुनगर, नाथनगर, योगक्षेम कॉलणी, प्रभावतीनगर, यलदरकर कॉलणी, बाळासाहेब ठाकरेनगर, त्रिमुर्तीनगरसह शहरातील अनेक वसाहतीमध्ये जलमय झाल्या. खुल्या मैदानांची तळी झाली. 

अनेक सखल भागातील घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले.

घरातील गृहयोपयोगी साहित्य पाण्याखाली गेले. पावसाच्या पहिल्याच दणक्याने परभणीकरांना मोठा धक्का बसला. शहराच्या गावठाण भागातही रस्त्यावरून पाणी प्रचंड वेगाने वाहात होते. पावसाचे जोर एवढा होता की, या भागातील नाल्यांवर देखील दोन फुटापर्यंत पाणी वाहात होते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले होते. पहाटे तीन- साडेतीन नंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रस्त्यावरील पाणी हळूहळू ओसरू लागले. गांधी पार्क, क्रांती चौक, गुजरी बाजार, कच्छी बाजार, जुना मोंढा, कडबी मंडी, नारायण चाळ आदी भागातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. वांगी रोड, धाररोड, परसावतनगर, साखला प्लॉट आदी सखल भागदेखील जलमय झाला. अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचले आहेत.पहिल्याच पावसात महापालीकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडले आहे.

धामोडा नाल्याला पाणी

परभणी शहरातून धार मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील धार गावाजवळ असलेल्या धामोडा नाल्यास पहाटे पुर आला. नाला भरुन वाहत असल्याने रस्ता पाण्याखाली गेल्याने पुढच्या साटला, धार, दुर्डी, मसापूर, मटकऱ्हाळा, मांगणगाव, संबर, सावंगी, बोबडे टाकळी, जोडपरळी या गावांचा संपर्क काही वेळासाठी तुटला होता. वरच्या भागातून तुफान वेगाने पाणी येत असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत रस्ता बंद होता. दुपारी एकच्या दरम्यान या रस्त्यावरची वाहतुक सुरळीत झाली.

गंगाखेड रस्त्यावरची वाहतुक ठप्प

परभणी ते गंगाखेड महामार्गाचे काम सुरु आहे. या दरम्यान ब्राम्हण गाव जवळील पुलाचे काम सुरु असल्याने बाजुने रस्ता काढुन दिला आहे. परंतु गुरुवारी पहाटे झालेल्या पावसाने हा रस्ता वाहुन गेला आहे. सकाळी १० वाजेपर्यंत या कच्या रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने काहीवेळ वाहतुक ठप्प झाली होती. परिसरातील जिनींग, मोकळ्या मैदानात देखील नाल्याचे पाणी शिरल्याने परिसराला तळ्याचे स्वरुप आले होते. परभणी ते जिंतुर महामार्गावरील टाकळीजवळ असलेल्या पुलाचे काम सुरु असल्याने याठिकाणी देखील पावसामुळे वाहतुक ठप्प झाली होती.

चार मंडळात अतिवृष्टी

परभणी, पाथरी, मानवत, झरी या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मान्सून येण्याआधीच अतिवृष्टी झाली असून त्यामुळे चारही मंडळातील नाले भरुन वाहत आहेत.

मंडळनिहाय झालेला पाऊस

परभणी शहर- ८५, परभणी ग्रामीण ४६, सिंगनापूर- ४४, दैठणा- ३८, झरी
६७, पेडगाव- ३८, पिगंळी- २८, जांब- ४१, पालम- १९, चाटोरी- २७, बनवा- २५, पूर्णा-१८, ताडकळस- १२, चुडावा- ४०, लिमला- १६, कातनेश्वर- ३०,गंगाखेड- २४, राणीसावरगाव-१६, माखणणी- २५, महातपुरी- २२, सोनपेठ- २६, आवलगाव- २६, सेलु- १४, देऊळगाव- १०, कुपटा- ५८, वालूर- ५०, चिकलठाणा- २९, पाथरी- ७०, बाभळगाव- २०, हादगाव- ५५, जिंतुर- २१, सावंगी
म्हाळसा- १२, बोरी- ३४, चारठाणा- १८, आडगाव- १९, बामणी- चार,मानवत- ७०, केकरजवळा-५५, कोल्हा- ५९ असा एकुण ३३. ६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७०. ३४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com