परळी पंचायत समितीच्या सभापती असलेल्या पत्नीविरोधात अविश्वास ठराव; जमावबंदी तोडल्याने पतीला अटक, घरी सापडली शस्त्रे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये, पोलिस निरीक्षक हेमंत कदम हे पथकासह अंबाजोगाई रस्त्यावरील बबन गित्ते यांच्या घरासमोर गेले. यावेळी येथील गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला.

बीड : परळी पंचायत समितीत सभापती असलेल्या पत्नी उर्मिला गित्ते यांच्या विरोधात गुरुवारी (ता.सात) दहाविरुद्ध शुन्य असा अविश्वास ठराव पारीत झाल्यानंतर सायंकाळी त्यांचे पती शशिकांत उर्फ बबन गित्ते यांना अटक करण्यात आली. जमावबंदीचे नियम तोडल्याप्रकरणी अटकेनंतर घराची झडती घेतली असताना गावठी पिस्तुलांसह पोलिसांना शस्त्रे आढळली.  जनक्रांती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करणारे शशिकांत उर्फ बबन गित्ते यांनी विधानसभा निवडणुकीत परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना मदत केली होती.

मराठवाड्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी रिमझिम पाऊस, पिकांना फटका 

त्या बदल्यात वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नी उर्मिला गित्ते यांना परळी पंचायत समितीचे सभापतीपद देण्यात आले. मात्र, सभापतीपदाच्या काळात राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सरपंचांना निधी वाटपात दुर ठेवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सढळ हात सोडल्याने नाराजी वाढली होती. अखेर सदस्यांनी उर्मिला गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करुन गुरुवारी (ता. सात) दहाविरुद्ध शून्य असा हा ठराव संमत झाला. यामुळे बबन गित्ते यांचे समर्थक संतापले व एकत्र आले आणि त्यांनी गित्तेंच्या घराबाहेर गर्दी केली.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये, पोलिस निरीक्षक हेमंत कदम हे पथकासह अंबाजोगाई रस्त्यावरील बबन गित्ते यांच्या घरासमोर गेले. यावेळी येथील गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शासकीय कामात अडथळा करुन लोकांनी दुर जाण्यास नकार दिला. त्यामुळे सुरुवातीला शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि जमावबंदीच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्या घराची झडती घेतली असता दोन गावठी पिस्तुल, चार काडतुसे, एक कोयता, लाठ्या - काठ्या अशी शस्त्रेही आढळून आली. अटकेसह या कारवाईमुळे परळीत काही काळ तणाव निर्माण झाला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parli Panchayat Samiti Ex Chairman Husband Arrested Beed News