छे..छे..लातूरात जिल्हाबंदी आहे म्हणता? मग बाहेरुन का येताहेत लोकं? 

सुशांत सांगवे
Saturday, 25 April 2020

कोरोनाचा फैलाव टाळता यावा म्हणून राज्यात जिल्हाबंदी जाहीर करण्यात आली असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी लातूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये होताना दिसत नाही. रेड झोनमध्ये असलेले मुंबई, पुण्यासह वेगवेगळे जिल्हे ओलांडून लातूरात येणाऱ्या नागरिकांचा ओघ कायम आहे. त्यामुळे राज्यात जिल्हाबंदी अजून कायम आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

लातूर : कोरोनाचा फैलाव टाळता यावा म्हणून राज्यात जिल्हाबंदी जाहीर करण्यात आली असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी लातूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये होताना दिसत नाही. रेड झोनमध्ये असलेले मुंबई, पुण्यासह वेगवेगळे जिल्हे ओलांडून लातूरात येणाऱ्या नागरिकांचा ओघ कायम आहे. त्यामुळे राज्यात जिल्हाबंदी अजून कायम आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी दिल्या. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही यावर भर दिला. कोणीही बाहेरचा व्यक्ती लातूर जिल्ह्यात प्रवेश करता कामा नये, असे सांगूनही बाहेरील जिल्ह्यातून आणि परराज्यातून लातूरात येणारे नागरिक अजूनही दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्हाबंदीच्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शुक्रवारी (ता. २४) दिवसभरात ७० जणांची ‘कोरोना’च्या संदर्भात तपासणी करण्यात आली. यात ४१ जण हे परजिल्ह्यातून आल्याचे समोर आले. याआधी दोनच दिवसांपूर्वी मुंबई, पुणे हैदराबाद येथून जवळपास २५ नागरिक लातूरात आले. याबाबत पालकमंत्री अमित देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजीही व्यक्त केली होती. तरीसुद्धा, परराज्यातील आणि परजिल्ह्यातील नागरिकांचा वेगवेगळ्या मार्गाने लातूरमध्ये ओघ कायम आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

त्यातच उदगीर येथे आढळून आलेली कोरोनाबाधीत महिलासुद्धा इतर राज्यातून लातूर जिल्ह्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिस आणि जिल्हा प्रशासन यापुढे तरी जिल्हाबंदी प्रभावीपणे राबविणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कोणालाही सुट देऊ नका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सीमा अधिक कडक कराव्यात. कोणत्याही नागरिकांना आवश्यक कारणाशिवाय सुट देऊ नका. या काळात नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा सुचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने या वेळी उपस्थित होते. परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवावे. नगरसेवकांनी आपल्या भागात मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही बनसोडे यांनी केले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples Coming In Latur without Permission of Collector Latur News