esakal | डोंगरशेळकी तांड्याचा पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

udgir

डोंगरशेळकी तांड्याचा पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठे नुकसान

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर): डोंगरशेळकी तांडा (ता.उदगीर) येथील पाझर तलाव क्रमांक दोन शनिवारी (ता.२४) दुपारी बाराच्या सुमारास फुटला. पाण्याच्या प्रवाहामुळे त्याखालील जवळपास वीस ते पंचेवीस शेतकऱ्यांचे पन्नास हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, डोंगरशेळकी तांडा येथील पाझर तलाव गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात झाडांची वाढ झाली होती.अनेक वेळा संबंधित जलसिंचन स्थानिक स्थर विभागाला कळवूनही या विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या तलावाच्या मध्यभागी पाळुला भगदाड पडले होते.

गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पडलेल्या रिमझिम पावसाने या पाझर तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. अचानकपणे शनिवारी हे भगदाड सकाळपासून हळूहळू मोठे होऊ लागले. ही परिस्थिती पाहून नागरिकांनी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर तात्काळ तहसीलदार गोरे यांनी संबंधित जलसिंचन विभागाचे उपअभियंता नाईक यांना आदेश देऊन घटनास्थळी रवाना केले. तेथे जाण्यासाठी आवश्यक असणारे जेसीबी, पोकलेन पाठवण्यात आले तेथे जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने वेळेवर यंत्रणा पोहोचू शकली नाही.

हेही वाचा: उपविभागीय पोलिस अधिकारी १० लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

हे भगदाड वाढत जाऊन शेवटी बाराच्या सुमारास पाझर तलाव फुटला. पाणी मोठ्या प्रमाणावर वाहिल्याने जवळपास पन्नास हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. डोंगरशेळकी तांडा येथे घटनास्थळी तहसीलदार गोरे, संबंधित विभागाचे उपअभियंता नाईक, तलाठी दत्तात्रय मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. जलसिंचन विभागाने वेळीच या पाळूवरील झाडांचे व्यवस्थापन केले गेले असते तर हा तलाव फुटला नसता अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत उभ्या ट्रकवर कंटेनर आदळल्याने चालक ठार

शेकडो पाझर तलावाचीही परिस्थिती गंभीर...

जलसिंचन स्थानिक स्थर या विभागाअंतर्गत उदगीर, जळकोट तालुक्यातील शेकडो तलावाच्या मोठ्या प्रमाणावर झाडांची संख्या वाढली आहे. संबंधित ग्रामस्थांनी अनेकदा तोंडी व लेखी निवेदने देऊनही ही झाडे तोडली जात नाहीत. याकडे लक्ष देत नसल्यामुळे शेकडो पाझर तलावास धोका निर्माण झाला आहे. डोंगरशेळकी तांड्याची ही घटना पाहता झाडे वाढलेल्या तलावाकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे

loading image
go to top