परभणीत सुदृढ आरोग्यासाठी प्लास्टिक हटाव मोहिम सुरु; पहिल्याच दिवशी गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

गणेश पांडे
Friday, 22 January 2021

ता. 21 आणि 26 जानेवारी या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम राबविण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आवाहन केले आहे

परभणी ः ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावे आणि खेडोपाडी स्वच्छतेची संस्कृती रुजावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलेल्या प्लास्टिक कचरा गोळा करण्याच्या मोहिमेला जिल्ह्यात गुरुवारी (ता.21) पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ता. 21 आणि 26 जानेवारी या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम राबविण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आवाहन केले आहे. या मोहिमेला जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्लास्टिक गोळा करून प्रतिसाद नोंदवला. गुरुवारी (ता.21) मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अधिकारी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातील स्वतः प्लास्टिक कचरा गोळा करून जिल्ह्यातील नागरिकांना प्लास्टिक बंदीचा संदेश दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, राजेश देशमुख ज्ञानेश्वर सामाले, दशरथ सामाले, सदाशिव देशमुख, टी एम सामाले, शिवाजी देशमुख, विनायक सामाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पूर्वीच्या काळी शेणा मातीच्या खत खड्ड्यांमध्ये प्लास्टिकचा वापर दिसायचा नाही. परंतु आजच्या परिस्थितीत विचार केला तर त्या खड्ड्यामध्ये फक्त प्लास्टिकचेच जाळे दिसत आहे. यामुळे पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा मोठा ऱ्हास होत आहे. जांब, सिताफळ, लिंब, बोर, अशी फळांची झाडे प्लास्टिक वर कधीच येत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा.

- शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic removal campaign launched for better health in Parbhani