ऊन, वारा, पाऊस झेलत ‘या’ झोपडीचा मिळतोय पोलिसांना आधार 

file photo
file photo

देवगावफाटा (जि.परभणी) : परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवगाव फाटा (ता. सेलू, जि. परभणी) येथे औरंगाबाद - नांदेड महामार्गावर चेकपोस्ट सुरू केले आहे. या चेकपोस्टवर दोन महिन्यांपासून स्वतःचे घरदार सोडून दररोज चोवीस तास रखरखत्या उन्हात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रंदिवस पोलिस कर्मचारी सेवा देत आहेत. त्यामुळे या योद्धांच्या मुक्कामासाठी येथे उभारण्यात आलेली ‘ती’ झोपडीच आता त्यांचे निवासस्थान ठरली आहे.
परभणी जिल्ह्याला लागूनच असलेल्या जालना व औरंगाबाद या जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात विनापरवाना दाखल होणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्यासह परजिल्ह्यातून परतणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या या सीमेवर पोलिस चेकपोस्ट उभारले आहे.


अहोरात्र पोलिसांचा पहारा

या चेकपोस्टवर दररोज अहोरात्र पोलिस कर्मचारी पाहारा देत आहेत. कुठल्याही स्थितीत त्यांना चेकपोस्ट सोडणे अशक्य आहे. कारण पोलिसांची थोडीही हेळसांड संपूर्ण परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पुसरवण्यास कारणीभूत ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊनच चेकपोस्टवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, हे कर्तव्य बजावतांना त्यांना योग्य असा निवाराही नसल्याने वाहनावर लक्ष ठेवत रस्त्यावरच रात्र काढावी लागत आहे. त्यासाठी औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील देवगाव फाटा चेकपोस्टवर अहोरात्र पाहारा देत असलेल्या या योद्धांकरिता आता ‘ती’ झोपडीच निवासस्थान ठरली आहे.

हेही वाचा :​ शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बांधावर जा : कृषिमंत्री दादा भुसे

झाडांच्या सावलीचा आधार...!
आज बहुतांश ठिकाणच्या चेकपोस्टवर पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्था दिसून येत नसल्या तरी प्रत्येक नागरिकाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी पोलिस कर्मचारी उन्हातान्हात आपले कर्तव्य बजावत आहेत. सकाळपर्यंत काही नाही; परंतु दुपारी उन्हाचा पारा वाढला की, गरम चटके बसत आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी दुपारच्या सुमारास झाडांच्या सावलीचा आधार घेतांना दिसून येत आहेत.

घरी राहूनच या युद्धात सामील व्हावे
देशावर कोरोनाचे संकट असतांना अशा या कठीण परिस्थितीत देशाच्या पाठीशी उभे राहणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने घरी राहावे, आम्ही घराबाहेर आहोत तुमच्या रक्षणासाठी, त्यामुळे प्रत्येकानी घरी राहूनच या युद्धात सामील व्हावे.
- पी. जी. अल्लापूरकर, फौजदार.
 

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com