बीडमध्ये पोलिस तडकाफडकी निलंबित, दुचाकी सोडण्यासाठी मागितले पैसे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लॉकडाउनदरम्यान जप्त केलेल्या वाहनांच्या आणि वाहनमालकाच्या जामिनासाठी बालाजी मुळे या पोलिसाने पैसे मागितले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

बीड - लॉकडाउनमध्ये पकडलेली दुचाकी सोडण्यासाठी पैसे मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी (ता. १८) तडकाफडकी निलंबित केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, तीन दिवसांत चार पोलिस निलंबित झाले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बालाजी मुळे असे या निलंबित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लॉकडाउनदरम्यान जप्त केलेल्या वाहनांच्या आणि वाहनमालकाच्या जामिनासाठी बालाजी मुळे या पोलिसाने पैसे मागितले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तातडीने बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यांनी ठाण्यास भेट देऊन चौकशी करावी व अहवाल माझ्यासमोर सादर करावा, असे आदेश पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार आणि पोलिस अधिकारी यांच्या ग्रुपवरून दिले.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान    

दरम्यान, व्हिडिओतील पोलिसाने एक हजार रुपये स्वीकारल्याचे स्पष्ट होत असून आणखी एक हजार दे, साहेबांना द्यावे लागतात, असेही तो व्हिडिओत म्हणत आहे. ही गंभीर बाब असून अशा प्रकारामुळेच पोलिसांची जनमानसात प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

तीन दिवसांत चार पोलिस निलंबित 
दरम्यान, सध्या लॉकडाउनच्या काळात विनापरवाना बाहेरून आलेल्यांना चेकपोस्टवरून पैसे घेऊन सोडले जात असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी डमी प्रवासी पाठविण्यात आले. यात शहागड - खामगाव चेकपोस्टवरील तिघे या स्टिंगमध्ये अडकले होते. त्यांना तीनच दिवसांपूर्वी निलंबित केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police in Beed suspended, demanded money to leave the bike