
नांदेड महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी आणि कामगारांचा पोलिस विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना मास्क, सॅनीटायझर, हॅण्डग्लोजचे वाटप करण्यात आले आणि अल्पोपहारही देण्यात आला.
नांदेड - शहर स्वच्छ ठेवण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी व कामगारांचे शुक्रवारी (ता. तीन) पोलिस विभागाच्या वतीने कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर त्यांना अल्पोपहार तसेच सॅनीटायझर, मास्क आणि हॅण्डग्लोजही देण्यात आले.
नांदेड महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने तसेच आर अॅण्ड बी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या स्वच्छता आणि साफसफाई महत्वाची आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता आणि साफसफाईचे नियोजन केले आहे. त्यामुळे या सफाई कर्मचारी व कामगारांचा पोलिस विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलिस उपाअधिक्षक अभिजित फिसके, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, महापालिकेचे उपायुक्त शुभम क्यातमवार, स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हे ही वाचा - नांदेडमध्ये किराणा मालाची चढ्या भावाने विक्री
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
गेल्या ता. २२ मार्चपासून स्वच्छता आणि साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे आभार मानण्यासाठी तसेच कौतुक करण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी शुक्रवारी (ता. तीन) वजिराबादला मुथा चौक येथे सकाळी कार्यक्रम घेतला. यावेळी सफाई कर्मचारी आणि कामगारांचा सत्कार करुन कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्यांना मास्क, हॅण्डग्लोज, सॅनीटायझर देण्यात आले.
पोलिस अधिक्षकांनी केले कौतुक
जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सफाई कर्मचारी आणि कामगारांचे कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि साफसफाई महत्वाची असून त्या दृष्टीने नांदेड शहरात स्वच्छतेची महत्वाची जबाबदारी हे कर्मचारी पार पाडत आहेत. स्वच्छतादूतांचे सध्याच्या परिस्थितीत स्वच्छतेचे काम महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती आदरभाव राखत आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले. पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी देखील रात्रदिवस काम करत आहेत. त्यांनी देखील आपतकालीन व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांचे स्वागत करावे आणि त्यांच्याशी सौजन्याने वागून त्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. मगर यांनी व्यक्त केली.
हे ही वाचलेच पाहिजे - सावधान...! मुलांच्या भावविश्वातील खदखद घ्या जाणून
सफाई कामगारही भारावले
पोलिस विभागाने केलेल्या सत्कारामुळे आणि दिलेल्या भेटवस्तूमुळे सफाई कर्मचारी आणि कामगारही भारावून गेले. त्यातील काही जणांनी आपल्या भावनाही यावेळी व्यक्त केल्या. आमचे काम महत्वाचे असले तरी दुर्लक्षित आहे. तरी देखील आमच्या कार्याची दखल पोलिस विभागाने घेतली त्याबद्दल मनापासून आभार. आमची काळजी घेतल्याबद्दल तसेच आमच्याबद्दल दाखविलेल्या आपुलकीमुळे आम्हाला देखील काम करताना आणखी बळ मिळणार असल्याचे सांगितले.