आता सारेकाही जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी.... 

बाबासाहेब गोंटे
Wednesday, 22 April 2020

‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’चा वसा घेऊन कार्य करणाऱ्या पोलिस प्रशासनाला आता जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी कष्ट घ्यावे लागत आहे. प्रसंगी कठोर होऊ; कारण हे सारे काही जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या अस्तित्वासाठी आहे, अशी भूमिका घेत पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांचे दिवसरात्र परिश्रम सुरू आहेत. 

अंबड (जि.जालना) -  ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’चा वसा घेऊन कार्य करणाऱ्या पोलिस प्रशासनाला आता जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी कष्ट घ्यावे लागत आहे. प्रसंगी कठोर होऊ; कारण हे सारे काही जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या अस्तित्वासाठी आहे, अशी भूमिका घेत पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांचे दिवसरात्र परिश्रम सुरू आहेत. 

कोरोनामुळे सध्या ‘स्टे होम’ हे प्रत्येकाच्या कानी पडत आहे. मात्र पोलिसांना जे घरात आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी घराबाहेर राहावे लागत आहे, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकरही यास अपवाद नाहीत. गेल्या कितीतरी दिवसांपासून ते कुटुंबापासून दूर आहेत.

हेही वाचा : त्यांच्या’साठी आता जिल्हाच बनलंय कुटुंब...

घरी पत्नी शिल्पा, मुली आरोही व शर्वरी यांच्यासोबत भेट नाही. निवांत गप्पाही आता शक्य नाही. केवळ फोनवरच काय ती सुखदुःखाची चर्चा. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीही समजदार. अर्थात जे घराबाहेर आहेत, त्या सर्वांबाबत कुटुंबीयांना वाटणारी काळजी इथेही आहे. आपले बाबा कोरोनाविरुद्धच्या महत्त्वाच्या लढाईसाठी मैदानात आहेत याचे भानही त्यांना आहेच. 

हेही वाचा : कोरोनामुक्तीच्या लढ्यासोबत जनतेची काळजी 

घरापासून दूर असणारे अनिरुद्ध नांदेडकरांना सध्या सकाळीच उठून नाष्टा व जेवण बनवावे लागते. आरोग्याची काळजी घेत योग व प्राणायामही ते करतात; पण सध्याचा काळच धावपळीचा बनलेला आहे. सारेच शक्य होईल असेही नाही. कधी पाणी पिऊनही घराबाहेर पडावे लागते. कोरोनाविरुद्धचा लढा लढताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परिश्रम सुरूच आहे. 

सहकाऱ्यांच्या साथीने सदैव सज्ज 

पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या साथीने ते सदैव सज्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन, संचारबंदीचे पालन, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, अवैध धंद्यांना पायबंद, विविध चेकपोस्टला भेटी, ग्रामीण भागात गस्त सुरूच आहे. अर्थात हे सारे करताना सहकाऱ्यांच्या आरोग्याबाबतही ते दक्ष आहेत. मग ठाण्याच सॅनिटायझरिंगची व्यवस्था असो नाहीतर मास्क, सॅनिटायझरचा वापर. 

कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी व लॉकडाउनचे पालन करावे. सद्यःस्थितीत घरात राहून आपणांसह आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना हरेल व देश जिंकेल हाच निश्चय ठाम करावा. हीच मनापासून अपेक्षा आहे. 
- अनिरुद्ध नांदेडकर, पोलिस निरीक्षक, अंबड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officers efforts for public health