
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रार अर्जात कारवाई न करण्यासाठी सात हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.
बीड : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रार अर्जात कारवाई न करण्यासाठी सात हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने रविवारी (ता.२७) दुपारी केली. चरणसिंग वळवी असे लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये एक तक्रार अर्ज दाखल झाला होता. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ठाण्यातील पोलिस कर्मचारी चरणसिंग वळवी याने तक्रारदाराकडे लाच मागितली.
तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर संबंधिताने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर खातरजमा करून सापळा रचला. रविवारी दुपारी पोलीस कर्मचारी वळवी याने बसस्थानकातील चौकीमध्ये तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पकडून ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राहूल खाडे, अपर अधीक्षक अनिता जमादार, पोलिस उपअधीक्षक बालकृष्ण हानपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविद्र परदेशी, पोलीस नाईक श्रीराम गिराम, श्री. गोरे, श्री. गारदे, श्री. कोरडे यांनी केली.
संपादन - गणेश पिटेकर