वाळू माफियांविरुद्ध पोलिसांचा गनिमी कावा

गोंदी पोलिसांनी जप्त केलेली माफियांची वाहने.
गोंदी पोलिसांनी जप्त केलेली माफियांची वाहने.

गोंदी (जि. जालना) -  वाळू माफियांना रोखण्यासाठी गोंदी पोलिसांनी रात्रभर मुक्‍काम ठोकत गनिमी काव्याने वाळू माफियांविरुद्ध जम्बो कारवाई केली. यात अंबड तालुक्‍यातील साष्टपपिळगांव येथे शुक्रवारी (ता.24) पहाटे वाळू माफियांचे 3 ट्रक, 2 ट्रॅक्‍टर, 4 दुचाकी व एक कार अशी तब्बल दहा वाहने पोलिसांच्या हाती लागली. 

गोदापात्रातील वाढलेला वाळू उपसा तसेच तस्करीला लगाम घालण्यासाठी गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी गुरुवारी (ता. 23) आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून धडक कारवाईची मोहीम आखली होती. यात सहायक पोलिस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासह सुमारे दहा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

गोदापात्रात रात्रभर मुक्‍काम

पथकातील सर्वांना योग्य सूचना देऊन त्यांच्या चार तुकड्या करण्यात आल्या होत्या. चारही तुकड्या रात्री दोनच्या दरम्यान गोदापात्रात ठरलेल्या ठिकाणी पोचल्यावर वाळू तस्करांच्या हलचालीवर लक्ष ठेवून होत्या. वाळू उपशात मग्न असलेल्या शेकडो वाळू तस्करांवरच्या बारीकसारीक हलचालींवर त्यांचे लक्ष होतेच. 

फटाके फोडून गोळीबाराचा भास

गोदापात्रात वाळू माफियांची गर्दीच जमली होती. त्यामुळे पोलिसांनी पहाटे चारच्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत गोळीबार केल्याचा भास दाखवण्यासाठी गोदापात्रात फटाके वाजायला सुरवात केली. गोळीबाराच्या धडकीने वाळू तस्करांनी वाहने तेथेच सोडून जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढला. याच संधीचा फायदा घेत पोलिसांनी अचानक छापा टाकत अवैध वाळू उपसा, तस्करी, तसेच लोकेशनसाठी वापरलेली वाहने ताब्यात घेतली. तोपर्यंत सकाळ झाली होती. सकाळी साडेसहाला ही कारवाई पूर्ण झाली. तोपर्यंत महसूल विभागातील गोंदी सजाचे तलाठी अभिजित देशमुख हे एकटेच तेथे पोचले होते. 

यांनी केली कामगिरी

या कारवाईत गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, गोपनीय शाखेचे बाबा डमाळे, पोलिस कॉन्स्टेबल भास्कर आहेर, शेख अख्तर, करांडे, होमगार्ड किरण भाले व गोंदीचे तलाठी अभिजित देशमुख यांनी यशस्वी कामगिरी केली. 

पथकप्रमुखांना झाली दुखापत 

रात्रभर गोदापात्रातील काट्याकुपाट्यांत मुक्‍काम ठोकलेल्या अनेक पोलिसांना अंधारात खरचटले, मार लागला. तर धावपळ करताना पोलिसांचे पथकप्रमुख हनुमंत वारे यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. 

कारवाईनंतर पोचले महसूल पथक 

पोलिसांनी रात्रभर धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर पहाटे ही वाहने जप्त केली. वाहनांवर गुन्हे दाखल करण्यासाठी महसूलचे जम्बो पथक पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पकडलेल्या वाहनांबरोबर फोटो काढून शेअर करीत कारवाईत सहभागी असल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून रात्रभर पोलिसांना मदत करणारे ग्रामस्थही आचंबित झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com