गतवर्षीच्या सशस्त्र गुन्ह्यांची आता झाडाझडती 

उमेश वाघमारे 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जालना जिल्ह्यात येणारी गावठी पिस्तूल पोलिसांसाठी डोकेदुखी वाढविणाऱ्या ठरत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या सशस्त्र गुन्ह्यांची पुन्हा एकदा झाडाझडती सुरू आहे. आर्म्स ऍक्‍ट कायद्याप्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयितांवर कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

जालना -  गतवर्षी जिल्ह्यात आलेले गावठी पिस्तुलांचे लोण नवीन वर्षातही कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात परराज्यातून गावठी पिस्तूल येतात, असे म्हटले जाते. मात्र, त्याचे मूळ कोठे आहे, याचा शोध अद्यापही पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात येणारी गावठी पिस्तूल पोलिसांसाठी डोकेदुखी वाढविणाऱ्या ठरत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या सशस्त्र गुन्ह्यांची पुन्हा एकदा झाडाझडती सुरू आहे. आर्म्स ऍक्‍ट कायद्याप्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयितांवर कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

वर्षभरात दहा पिस्तूल जप्त 

पोलिस प्रशासनाने मागील वर्षभरात तब्बल दहा गावठी पिस्तूल जप्त केली. यात स्थानिक गुन्हे शाखेने सहा, एडीएसने तीन आणि सदर बाजार पोलिसांनी एक गावठी पिस्तूल जप्त केली. जिल्ह्यात गावठी पिस्तुलाचा वापर करून खून आणि खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हेही घडले आहेत. मात्र, जिल्ह्यात येणाऱ्या गावठी पिस्तुलाचे मूळ कोठे आहे ? याचा शोध पोलिसांना अद्यापही लागलेला नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या गावठी पिस्तुलांपैकी चार गावठी पिस्तूल पुरविणारा संशयित सुनील वनारसे याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मात्र, त्यानंतरही गावठी पिस्तुलाच्या मूळ अड्ड्यापर्यंत पोलिस पोचू शकले नाहीत. 

हेही वाचा : नहारचा घात गावठीच्या गोळीनेच... 

मोक्‍का, हद्दपारीसह अनेक पर्याय 

आता पोलिसांकडून जिल्ह्यातील 18 पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या आर्म्स ऍक्‍टच्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्या फाईल्स पुन्हा चाळल्या जात आहेत. आर्म्स ऍक्‍ट कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झालेल्या संशयितांवर पोलिसांकडून आता मोक्का, हद्दपारी यासह इतर कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाया करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. दरम्यान जिल्ह्यातील गावठी कट्टे हे पोलिसांसाठी नवीन आव्हान निर्माण करणारे ठरत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून जिल्ह्यात येणाऱ्या गावठी कट्ट्यांच्या साखळीच्या मुळाशी जाऊन कसा नायनाट करतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा : जालना बनलाय गावठी बंदुकवाल्यांचा अड्डा?  

यापूर्वी सात जणांवर मोक्‍का 

मागील आठवड्यात बदनापूर तालुक्‍यातील शेलगाव येथील ठेकेदार संजय अंभोरे खून प्रकरणातील सात संशयितांविरोधात संघटितपणे गुन्हे केल्याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या खून प्रकरणातही गावठी पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता हे विशेष. 

गोळी झाडणाऱ्याचा शोध सुरूच 

परतूर येथील व्यापारी राजेश नहार याच्यावर गावठी पिस्तूल गोळी झाडणाऱ्या शूटरचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान, पाच दिवसांनंतरही याप्रकरणी पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
परतूर येथील व्यापारी राजेश नहार याचा शनिवारी (ता. 11) रात्री जालना-वाटूर मार्गावर गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून तीन पथकांद्वारे या प्रकरणाचा चौफेर दिशेने तपास सुरू केला आहे; मात्र पोलिसांना अद्यापपर्यंत या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलेले नाही; परंतु पोलिसांकडून दिवस-रात्र या खून प्रकरणातील मुख्य शूटरचा शोध घेतला जात आहे; तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गावठी पिस्तूलचे धागेदोरे कोठे मिळतात का? याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या खून प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या गावठी पिस्तुलाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. यापूर्वी जिल्ह्यात गावठी पिस्तूल पुरविणाऱ्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षभरात आर्म्स ऍक्‍ट कायद्याप्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्यांची सर्व पोलिस ठाण्यांकडून माहिती संकलित करण्यात आली असून, या प्रकरणातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. 
-चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police will check all armed crimes of last year