आरं बाबा... सरपंच कोण होणार हाय? मत द्यायच कुणाला?

sarpanch
sarpanch

जळकोट (जि.लातूर) : आरं बाबा ....यावेळी सरपंच कोणाला करायच ठरवलंय बाबा..? असे सरपंच आरक्षणाबद्दल माहित नसलेले अनेकजण एकमेकाला विचारताना दिसत आहेत. सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने नेतृत्व माहित नसलेली निवडणूक तालुक्यातील ४3 ग्रामपंचायतीमध्ये होत आहे. इच्छुक सरपंचपदाच्या दावेदार उमेदवारांची हिरमोड झाला आहे. तर काहीही असो पुढे संधी मिळेल या आशेवर अनेकांनी रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.

अगोदर अनेक सरपंचपदी इच्छूक असणारे उमेदवार घरोघरी फिरून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी वाढवल्या होत्या. पुढील सरपंच आपणच असणार या भूमिकेत आणि तोर्‍यात गावा-गावातील  पुढारी वावरताना दिसत होते. परंतु आरक्षण रद्द निर्णयाने त्यांचा हिरमोड झाला.

तालुक्यातील मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतीवर शासनाने प्रशासकाची नेमणूक केली होती. ग्रामविकास मंत्रालय विभागाने सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रमही पुढे ढकलल्याने ग्रामपंचायत निवडणूक मतदान १५ जानेवारी झाल्याच्या नंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत होणार असल्याचे परिचत्रकाद्वारे जाहीर करून इच्छूक सरपंचपदाच्या दावेदार उमेदवाराची या निर्णयामुळे चांगलाच हिरमोड झाला आहे.

पॅनलप्रमुखांची कसरत 
आता गावाचा गावगाडा चालवणारे पुढारी हे नवीन आरक्षणाबद्दलचे समीकरण बघता आपले विश्वसनीय सदस्य यांना पॅनलमध्ये स्थान देऊन पाहताना दिसत आहेत. या आरक्षणाच्या गुंतागुंतीमध्ये पॅनलप्रमुख आणि भावी सरपंच यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. सामान्य नागरिकाकडून सरकारच्या या निर्णयाचे मोठया प्रमाणात स्वागत करण्यात येत असून आरक्षणाचा आरक्षित उमेदवार आणि त्यांच्यावरती पुढार्‍याने केलेला खर्च याला कुठेतरी आळा बसेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

निवडणुकीचा खर्च करायचा कोणी ? 
एरवी निवडणुकीच्या अगोदर ग्रामपंचायत आरक्षण सोडत होताच गावगाडा चालवणारे गावातील प्रतिष्ठित पुढारी हे आपल्या ऐकण्यातील  उमेदवारांना पॅनलमध्ये उमेदवारी देत. त्यांचा कागदपत्रासहित सर्व खर्चही पॅनल प्रमुख  करत असत आणि इच्छुक सरपंच केला जात असत. मात्र या सरपंच पद निवडणूक आधीच्या आरक्षण सोडतीचे सर्व निर्णय राज्य  सरकारने रद्द केल्याने मनपसंतीचा सरपंच आणि त्याच्यासाठी करण्यात येणारा खर्च गावगाडा चालवणारा पुढारी नेमका कसा आणि कुणावर खर्च करणार ? असा प्रश्न आहे. तर या निर्णयामुळे गावच्या सरपंच उमेदवारीवरून निवडणुकीचा फड मात्र चांगलाच रंगणार हे निश्चित ! गावोगावी निवडणूक पडघम वाजत असून अनेक गावात आखाडे रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com