esakal | AMC : भाजप, शिवसेना नगरसेवक बसले वेगवेगळ्या बाकांवर!
sakal

बोलून बातमी शोधा

Politics of Aurangabad Municipal Corporation
  • राज्यातील सत्तासंघर्षाचे महापालिकेत उमटले पडसाद 
  • एमआयएमच्या सदस्यांनीही भाग घेतला
  • सर्वसाधारण सभेत वातावरण गरम

AMC : भाजप, शिवसेना नगरसेवक बसले वेगवेगळ्या बाकांवर!

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपचा काडीमोड झाला. राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पाहायला मिळाले.

अभिनंदनाच्या प्रस्तावावरून भाजपच्या सदस्याने चिमटा काढला आणि शिवसेनेचे सदस्य भडकले. समोरासमोर जुगलबंदी सुरू असताना मध्येच एमआयएमच्या सदस्यांनीही भाग घेतला आणि काही काळ सर्वसाधारण सभेत वातावरण गरम झाले. 

महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.19) सर्वसाधारण सभा घेण्यात आली. पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केलेले भाजपचे राजू शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदारांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना, काहीजण कामाच्या बळावर, काही काम न करता तर काहीजण धाकदपटशा करून निवडून आल्याची टिप्पणी केली.

त्यांनी ज्यांच्याकडून पराभूत व्हावे लागले ते आमदार संजय शिरसाट यांच्या अनुषंगानेच हे वक्‍तव्य असल्याचे इतरांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. त्यावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, त्र्यंबक तुपे यांनी चोख प्रत्युत्तर देत भाजपच्या संकुचित वृत्तीवरच वार केला. जंजाळ यांनी, कुणी कशामुळे निवडून आले यावर चर्चा करण्याची ही जागा नाही.

निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन झाले पाहिजे. त्यात एमआयएमचे फेरोज खान यांनी शहर येथे खड्ड्यांत गेले आहे, लोक डेंगीने मरत आहेत, त्यात काय अभिनंदन करायचे अशी आडकाठी आणली आणि जंजाळ यांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवला. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा तुमचे खासदार कुठे होते, खासदार हरवले आहेत, अशी बातमी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर फिरत होती. तुमच्या खासदारांनाही जरा इकडे लक्ष द्यायला सांगा. या प्रत्युत्तराने एमआयएम सदस्यांची बोलती बंद झाली.

यापूर्वी अयोध्या निकालाबद्दल न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवनिर्वाचित आमदार व खेलो इंडियात निवड झालेल्या रिद्धी, सिद्धी हत्तेकर भगिनी आदींच्या अभिनंदनाचा मांडलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 
राजू शिंदे यांनी पराभवाची खदखद सभागृहात व्यक्‍त करताना शिवसेनेला लक्ष्य केले. विकास कामांवर हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, अतुल सावे निवडून आले आहेत, शिवसेनेचा विजय हा त्या मतदारसंघातील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांमुळे झाल्याचे सांगून पश्‍चिमच्या आमदारांवर निशाणा साधला. विकास म्हणता तर मग शिवसेना नेते चंद्रकांत खैरे का पडले, असा सवाल
करीत त्यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले. 

हेही वाचा - बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड
  
भाजपची जागा बदलली 
केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेतून बाहेर पडली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप सदस्यांनी दुसऱ्या बाकावर बसणे पसंत केले. महापौरांशेजारी भाजपचे उपमहापौर होते; मात्र सभागृहात दोन्ही पक्षांचे सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. एरवी दोन्ही पक्षांचे सदस्य एकत्र बसत. या सभेत मात्र शिवसेना व भाजपचे सदस्य वेगवेगळे बसले होते. भाजपच्या महिला नगरसेविकाही दुसऱ्या बाकांवर स्वतंत्रपणे बसल्या होत्या. 

हेही वाचा -  येमेनची कन्या झाली औरंगाबादची सून..