आता पॉपिन्स ही गेला दिल्लीला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • महापालिका आयुक्त परत येण्याची शक्‍यता मावळली
  • महापालिकेचा कारभार ठप्पच
  • कारने श्‍वानाला पाठविले दिल्लीला

औरंगाबाद- दीर्घ सुटीवर असलेले महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक परत येणार की नाही, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. निकटवर्तीय अधिकारी ते परत येतील असा अंदाज व्यक्त करत असतानाच शुक्रवारी (ता. 22) आयुक्तांच्या बंगल्यावर असलेला त्यांचा आवडता श्‍वान "पॉपिन्स'ही दिल्लीला गेला. त्यामुळे आयुक्त परत देण्याची शक्‍यता धूसर असल्याचे मानले जात आहे. 

आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची शहरातील भीषण कचरा कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादला बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ वारंवारच्या बदल्यांमुळेच चर्चेत राहिला. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. मात्र चिकलठाणा वगळता इतर तीन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात त्यांना यश आले नाही.

स्मार्ट सिटीचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून असताना शहर बससेवा, महापालिकेच्या इमारतीवर सोलर पॅनेल बसविणे ही दोनच कामे आयुक्तांना पूर्ण करता आली. दरम्यानच्या काळात ते वारंवार सुटीवर गेले. शहरात असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातूनच त्यांनी कामे केली. त्यामुळे प्रशासनावर अजिबात वचक राहिला नाही.

महापालिकेची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. डेंगीचे 11 बळी गेल्यानंतरही शहरात ठाण मांडून उपाययोजना करण्याऐवजी केवळ एक बैठक घेतल्यानंतर ते दीर्घ सुटीवर निघून गेले. मागील काही महिन्यात ते तब्बल 60 पेक्षा अधिक दिवस सुट्टीवरच होते. दरम्यान त्यांनी बदलीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. राज्य शासनाने त्यांचा सहा महिन्यांपूर्वीच बदलीसाठी एनओसी दिली आहे. मात्र, दिल्लीत पदस्थापना मिळत नसल्याचे त्यांच्या खेट्या सुरू आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीत त्यांनी महिनाभराची रजा मागितली होती. मात्र, ती मंजूर करण्यात आली नाही. दरम्यान, निवडणुका संपताच त्यांनी 24 ऑक्‍टोबरला शहर सोडले. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना एक महिन्यापासून नियमित आयुक्त नसल्याने सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, महापालिकेला नवा आयुक्त मिळावा यासाठी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी राज्यपालांना निवेदनही दिले आहे. 

अस्वस्थ श्‍वानाला हलविले! 
डॉ. निपुण विनायक यांच्या पत्नी डॉ. निधी या काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथे एका खासगी कंपनीत रुजू झाल्या. तेव्हापासून आयुक्तांचे दिल्ली येथे बदलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या त्यांच्या बंगल्यावर पॉपिन्स हा त्यांचा श्वान होता. एका महिन्यापासून पॉपिन्स व आयुक्तांची भेट नसल्याने श्‍वानही अस्वस्थ झाला होता. त्याला शुक्रवारी कारने दिल्लीला नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - पवार कुटुंबात कोण काय करतंय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poppins has gone to Delhi