‘या’ धर्मगुरूंच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना

शिवचरण वावळे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

0- तिबेटीयन रिफ्युजी स्वेटर मार्केटच्या वतीने उपक्रम
0- अनाथ मुलांना, दुर्धर आजारग्रस्त आणि मतीमंदाना भेट
0- दलाई लामा यांच्या नोबेल पारितोषकाचे तीस वर्षपूर्ती 

नांदेड : दलाई लामा हे तिबेटचे चौदावे धर्मगुरू आणि तिबेटचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. तिबेटला चीनच्या तावडीतुन सुटका मिळावी व तिबेटची स्वतंत्र ओळख कायम रहावी यासाठी त्यांनी शांतीच्या मार्गाने संघर्ष सुरू ठेवला. त्यांच्या या कार्यामुळे १९८९ साली दलाई लामा यांना नोबेल पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला होता. त्याला मंगळवारी (ता.१०) डिसेंबरला तीस वर्ष पूर्ण झाले. याच निमित्ताने नांदेड येथील तिबेटीयन रिफ्युजी स्वेटर मार्केटच्या वतीने (ता.नऊ,दहा) सलग दोन दिवस त्यांच्या दिर्घायुष्यासाठी सामुहिक प्रार्थना केली. तसेच येथील मतीमंद, अनाथ आणि दुर्धर आजारग्रस्तांना गरम कपडे वाटप केले. 

गरजवंतांना गरम कपड्यांचे वाटप

गेल्या पंधरा वर्षापेक्षा अधिक काळापासून नांदेड येथे तिबेटीयन रिफ्युजी स्वेटर विक्रेते शहरात येतात. त्यामुळे त्यांची नांदेड शहराशी नाळ जुळली आहे. दरवर्षी दलाई लामा यांच्या नोबेल पारितोषिक दिनाचे औचित्य साधून गरजवंतांना गरम कपड्यांचे वाटप करण्यात येते. यंदा त्यांनी नांदेडपासून जवळच असलेल्या नेरली कुष्ठधाम येथील गतिमंद, अनाथ व दुर्धर आजारग्रस्तांची मदत करण्याचे ठरवून उपक्रम हाती घेतला. या वेळी नांदेड तिबेटीयन रिफ्युजी स्वेटर एसोसिएशनचे प्रमुख धोंडोप ठिल्ले, श्री.पिंचोक, श्री. टशी, सोनम, नोनो, डॉ. हंसराज वैद्य, भारत तिबेट सहयोग मंचचे अध्यक्ष भास्कर डोईबळे, निफाचे डॉ. भरत जेठवाणी यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा-- ‘या’ जिल्ह्यात टंचाईवर पाण्यासारखा खर्च ​

हे आहे दलाई लामांचे खरे नाव

तिबेटचे धर्मगुरू तथा तिबेटचे अध्यक्ष हे जगभरात दलाई लामा याच नावाने ओळखले जातात. परंतु, त्यांचे खरे नाव ल्हामो धोंडुप असे आहे. त्यांचा जन्म सहा जुलै १९३५ साली तिबेटमध्ये झाला. त्यांच्या वडीलांचे नाव चोक्योंग त्सेरिंग तर, आईचे नाव डिकी त्सेरिंग असे आहे. त्यांना मंगोलियाई ही पदवी प्राप्त असून, याचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा होतो. दलाई लामा यांचे वंशज करुणा अवलोकेतेश्वर के बुद्ध के गुणों के साक्षात रूप मानले जातात. 

एकदा उघडून पहाच --नांदेडकरांनो सावधान...! सोने उजळून घेताय... 

नांदेड आणि आमचे नाते आता घट्ट

आमचे धर्मगुरू दलाई लामा यांना शांतीसाठी दिला जाणारा सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार मिळाल्यापासून आम्ही मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करत असतो. नांदेड आणि आमचे नाते आता घट्ट झाले आहे. त्यामुळे दरवर्षी अनाथालय, मुकबधिर, अपंग आणि गरजवंतांचा शोध घेवून त्यांना आवडत्या गरम कपड्यांचे वाटप करत असतो. 
श्री.पिंचोक तिबेटीयन स्वेटर विक्रेते.     

re>

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pray for the longevity of 'these' priests