खासगी रुग्णालये बंद, रुग्णांचे उपचाराविना हाल 

रामदास साबळे
Saturday, 28 March 2020

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशावेळी माणुसकीचा धर्म म्हणून खासगी रुग्णालये ठराविक कालावधीसाठी का होईना सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.

केज (जि. बीड) -  सद्यःस्थितीत कोरोनासारख्या आपत्तीचा प्रसार रोखण्यासाठी शासन अनेक उपाययोजना आखत आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत असताना साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालये उपलब्ध होत नसल्याने जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळे याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशावेळी माणुसकीचा धर्म म्हणून खासगी रुग्णालये ठराविक कालावधीसाठी का होईना सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.

सध्या शासनाचे शासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश आहेत. त्यामुळे आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य, पोलिस, महसूल, पंचायत, वीज महावितरण, बँक, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका हे कर्मचारी घरोघरी जाऊन जनतेला शटडाऊनची हाक देऊन सेवा पुरवत आहेत. मात्र इतर वेळी खासगी रुग्णालये बंद करून बसले आहेत. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून त्यांनीदेखील ठराविक कालावधीसाठी आरोग्य सेवा देणे आवश्यक आहे. हे रुग्णालय बंद असल्याने सगळा ताण शासकीय आरोग्य यंत्रणेवर आल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - कोरोना विषाणू येऊच नये म्हणून....

याबाबत खासगी रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधला असता ते म्हणाले, आमच्याकडे सेफ्टी किट नसल्याने आम्हाला अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवा देणे अवघड आहे. कारण कोरोना संसर्ग झालेला एखादा रुग्ण अशावेळी येथे संपर्कात आल्यास आमच्यासह उपचारासाठी येणाऱ्या इतर रुग्णांचीही मोठी अडचण होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नसल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private hospitals closed, patients without treatment