माजलगाव धरणग्रस्तांच्या समस्या संपेना 

कमलेश जाब्रस
शनिवार, 14 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणग्रस्तांच्या समस्या अद्याप कायम आहेत. परतीच्या पावसाने पूल खचल्याने उघड्या आहेत. रस्ता उखडला असून, पाटबंधारे विभागाची उदासीनता दिसून येत आहे. 

माजलगाव (जि. बीड) - माजलगाव धरणाच्या निर्मितीनंतर तब्बल 37 वर्षांनंतरही धरणग्रस्त शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना आजतागायत करावा लागत आहे. धरणालगत असलेला पूल खचला आहे, तर रस्ता उखडला आहे. असे असताना पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. 

माजलगाव धरणाची निर्मिती 1982 ला झाली. आज 37 वर्षे उलटून गेली असली तरी या पुनर्वसित गावांमध्ये पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या यासह मूलभूत सुविधा मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने पुरविल्या नाहीत. माजलगाव धरणाच्या निर्मितीमुळे 22 गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व घरे धरणाच्या पात्रामध्ये गेले. उर्वरित राहिलेल्या शेतजमिनी धरणाच्या दुसऱ्या बाजूस आहेत.

हेही वाचा - माजलगावात द बर्निंग ट्रक, अचानक घेतला पेट

सुरवातीच्या काळात धरणाच्या भिंतीवरूनच शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बाब म्हणून धरणाच्या भिंतीवरून ये-जा न करता सिंदफणा नदीपात्राजवळून पूल मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला होता. या पुलाचे कामदेखील झाले; परंतु या पुलाचे निकृष्ट काम झाल्यामुळे पुलाला भगदाड पडलेले आहे, तर कठडे वाहून गेले आहेत.

हेही वाचा - माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू?

गज चक्क उघडे पडले आहेत; तसेच या पुलावरून ढोरगावपर्यंत जाणारा डांबरी रस्ताही संपूर्णतः उखडला आहे. शेतकऱ्यांना शेतमाल, जनावरे ने-आण करण्यासाठी दिव्य कसरत करावी लागते. या भागातील शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याचे कारण सांगून ऊस गाळपास जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. 

 

देवखेडा ते शेतरस्त्यावरून धरणाकडे जाणारा पूल यावर्षीच्या परतीच्या पावसाने वाहून गेला आहे. यामुळे देवखेडा भागातील शेतकऱ्यांना रस्ताच नसल्याने जाण्या-येण्यासाठी फरपट होत आहे. मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. 
- अशोक जोगडे, शेतकरी, देवखेडा. 

परतीच्या पावसाने पूल तर खचलाच आहे; परंतु दुभती जनावरे या पुलावरून घसरून मृत्युमुखी पडल्याच्याही घटना आहेत. वारंवार निवेदने देऊनही पाटबंधारे विभागाकडून ना रस्ता, ना पूल झाला. लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन प्राधान्याने हा प्रश्‍न मार्गी लावावा. 
- सुभाष जोगडे, शेतकरी, देवखेडा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The problem of Majalgaon Dam sufferers is not over