लातूर : कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता होणार जप्त

हरी तुगावकर
गुरुवार, 25 जुलै 2019

लातूर शहरातील मालमताधारकांकडे मालमत्ता कराची 106 कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने मालमत्ता जप्ती करण्याची मोहिम राबवली जाणार आहे. याबाबतचे निर्देश आयुक्त एम. डी. सिंह यांनी दिले आहेत.

लातूर : लातूर शहरातील मालमताधारकांकडे मालमत्ता कराची 106 कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने मालमत्ता जप्ती करण्याची मोहिम राबवली जाणार आहे. याबाबतचे निर्देश आयुक्त एम. डी. सिंह यांनी दिले आहेत.

महापालिकेत गुरुवारी (ता. २५) सिंह यांनी आढावा बैठक घेतली. शहरात मालमत्ता कराची 106 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी 25 ऑगस्टपर्यंत 40 कोटी रुपये वसुली करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये आयुक्त यांनी मोठ्या थकबीकाच्या मालमत्ता धारकांना मोबाईलकरून स्वतः चर्चा केली. तसेच २६ जुलैपर्यंत कर भरणा करण्याबाबत सूचना दिल्या. त्यांच्याकडून कराची थकबाकी भरणा न केल्यास सदरील मालमत्ता जप्ती मोहीम त्वरित राबविण्यात यावी, असे आदेशीत केले. 

तसेच प्रत्येक वसुली लिपिक निहाय ७५ हजार रुपयांवरील सर्व थकबाकीदारांना आजच दूरध्वनी करून कराची थकबाकी चार दिवसाच्या आत भरणा न केल्यास त्यांच्यावर ही कारवाई करण्याचे आदेशीत केले.

यापूर्वी थकीत कर भरणा करण्याबाबत नोटीस दिलेल्या आहेत. याबाबत पाठपुरावा करण्यात यावा. ही वसुली झाली तरच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारणा होऊन नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा देता येणार आहेत. तरी सर्व लातूरकरांनी आपली थकीत मालमता कर व पाणीपट्टी भरणा करून लातूर शहर महानगर पालिकेस सहकार्य करावे व आपणावर होणारी जप्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नळ जोडणी तोडा

पाणीपट्टीची थकबाकी 48 कोटीची आहे. तसेच चालू मागणी दहा कोटीची आहे. या थकबाकीची वसुली करावी. थकबाकीदाराने तातडीने पाणीपट्टी भरली नाही तर त्यांची नळ जोडणी तोडावी, असे आदेशही सिंह यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Property will be Seized who not pay their Property Tax