जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळवाऱ्यासह पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

जिल्ह्यात जाफराबाद, भोकरदन, बदनापूर तालुक्यासह ठिकठिकाणी रविवारी (ता. ३१) दुपारी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर कमी असला, तरी वादळवारे जास्त होते. परिणामी, घरांवरचे पत्रे उडाले. काही ठिकाणी घरात ठेवलेला कापूसही भिजला. 

जालना - जिल्ह्यात जाफराबाद, भोकरदन, बदनापूर तालुक्यासह ठिकठिकाणी रविवारी (ता. ३१) दुपारी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर कमी असला, तरी वादळवारे जास्त होते. परिणामी, घरांवरचे पत्रे उडाले. काही ठिकाणी घरात ठेवलेला कापूसही भिजला. 

भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरासह पळसखेडा काळे येथे घरांवरील पत्रे उडाले. काहीजण जखमीही झाले. खामखेडा येथे वीज पडून दुचाकीचे नुकसान झाले.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

पारध व परिसरात ढगाळ वातावरण होते. मंठा तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरणामुळे कमालीचा उकाडा जाणवला. जांबसमर्थ (ता. घनसावंगी) येथे रविवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसासोबत वादळी वारे होते.

हेही वाचा : अख्खा जेसीबीच विहिरीत गुडूप

या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. घनसावंगी शहरात रिमझिम पाऊस पडला. परतूर परिसरात ढगाळ वातावरण होते.  जाफराबाद शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावली. टेंभुर्णी परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. 

वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 

टेंभुर्णी -  भेंडीची लागवड करण्यासाठी मल्चिंग करीत असलेल्या आळंद (ता. जाफराबाद) येथील प्रभाकर सूर्यभान गायकवाड (वय २८) या शेतकऱ्याचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ३१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. 
खरीप हंगामातील भेंडी पिकाची लागवड करण्यासाठी शेतामध्ये रविवारी प्रभाकर गायकवाड हा मल्चिंग अंथरण्याचे काम करीत होता. याचवेळी अचानक वादळवाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. शेतात काम करणाऱ्या प्रभाकर याच्या अंगावर वीज पडली. त्याला टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा डॉ. अमोल वाघ यांनी तपासून प्रभाकर यास मृत घोषित केले. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. प्रभाकर गायकवाड याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ असा मोठा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district