जालना जिल्ह्यात श्रावणधारा कोसळल्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

जिल्ह्यात यंदा श्रावण महिन्यापासून ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.२४) अनेक भागांत श्रावणधारा कोसळल्या. या पावसाचा खरीप पिकांना लाभ झाला आहे. काही भागांत मात्र सततच्या पावसामुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत.

जालना -  जिल्ह्यात यंदा श्रावण महिन्यापासून ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.२४) अनेक भागांत श्रावणधारा कोसळल्या. या पावसाचा खरीप पिकांना लाभ झाला आहे. काही भागांत मात्र सततच्या पावसामुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. 

अंबड तालुक्यातील जामखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दररोज पाऊस पडत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारीच या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. या परिसरात पिके जोमात आहेत; मात्र आता पावसाने पीक राहते की जाते अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे, काही शेतांत तर पिके पाण्यात बुडालेली आहेत. 

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची नियमित हजेरी आहे. परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस पडला. अनेक शेतांतून पाणी वाहू लागले. काही शेतांत सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कपाशी, सोयबीन पिकात फवारणी केली; मात्र दुपारनंतर पावसाला सुरवात झाल्याने फवारणीसह मशागतीची कामे थांबवावी लागली. परिसरात पडलेल्या दमदार पावसाने तलावातील पाणीसाठ्यातही आता वाढ होत आहे. याशिवाय गिरिजा-पूर्णा दुथडी वाहत आहे. दमदार पाऊस पडल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. 

हेही वाचा : धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह परिसरात शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी सहा वाजल्यापासून हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अधूनमधून पावसाचा जोरही वाढत होता. सध्या पावसाने आंतरमशागतीची कामे खोळंबत आहेत. शेतशिवारांत खुरपणी, कोळपणी, पाळी, खत टाकणे आदी कामे वाफसा नसल्याने बंद पडली आहेत. जांबसमर्थ व परिसरात शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पाच वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाच्या उघडिपीनंतर आंतरमशागतीची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली. त्यानंतर सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. 

दुथडी भरून वाहिली जीवरेखा नदी 

जाफराबाद तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला. टेंभुर्णी परिसरात शुक्रवारी  जीवरेखा नदीला मोठा पूर आला होता. दमदार पाऊस पडल्याने परिसरातील नदी, नाले, ओढे खळखळून वाहिले. जीवरेखा नदीवर येथील आंबेगाव रोडवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांचे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे कठीण झाले. शेतकरी; तसेच ग्रामस्थ दोन्हीकडील काठांवर अडकून पडले होते.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district