esakal | सततच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हिरावला घास 
sakal

बोलून बातमी शोधा

नानेगाव (ता. बदनापूर) शिवारात पिकांत शिरलेले पावसाचे पाणी

पिकांसाठी वरदान ठरणारा पाऊस रोषणगाव शिवारात मात्र मुळावर उठला आहे. या मंडळात सातत्याने पाऊस ठाण मांडून आहे, त्यात चारदा अतिवृष्टीत झाल्याने पिकांचे पुरते नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला गेला आहे

सततच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हिरावला घास 

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) -  पिकांसाठी वरदान ठरणारा पाऊस रोषणगाव शिवारात मात्र मुळावर उठला आहे. या मंडळात सातत्याने पाऊस ठाण मांडून आहे, त्यात चारदा अतिवृष्टीत झाल्याने पिकांचे पुरते नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

तालुक्यातील सर्वाधिक अवर्षणग्रस्त भाग म्हणून रोषणगाव मंडळाची ओळख आहे. या भागात २०१२ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळानंतर फळपिकांची रयाच गेली. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या फळबागांवर वरवंटा फिरवला होता. त्यामुळे कायम पेरणीसाठी पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वरुणराजा पावला.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

पहिलाच पाऊस पेरणीयोग्य झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, मूग आदी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र निसर्गाच्या गर्भात काही औरच दडलेले होते. इकडे शेतकऱ्यांनी पेरणी उरकली आणि तिकडे पाऊस अक्षरशः कोपला. या भागात जणू पावसाने ठाणच मांडले अशी परिस्थिती उभी राहिली. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. एकाच रात्री २०७ मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यात पेरलेली बियाणे, जमिनीत टाकलेली महागडी खतेच काय तर जमिनीची मातीही वाहून गेली. बांध-बंधारे फुटले, शेतांचे तलाव झाले, नद्या ओसंडून वाहू लागल्या, ओढ्या-नाल्यांनी रौद्ररूप धारण केले, रस्ते खचले, काही ठिकाणी जनावरेही वाहून गेली, घरांची पडझड झाली असे अनर्थ घडले. 

मदतीची प्रतीक्षा कायमच 

लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रोषणगाव मंडळाला भेटी देऊन नुकसानीचा अंदाज घेतला, मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र आजही शेतकऱ्यांच्या पदरात कुठलीही शासकीय मदत मिळालेली नाही. त्यानंतरही पावसाने आपला स्वभाव काही बदलला नाही. अगदी निष्ठुर होऊन तो कोसळत राहिला. ढगफुटीनंतरही रोषणगाव शिवारात तीनदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे या भागातील शेतकरी पुरते खचले आहेत. 

अनेक गावांना पावसाचा फटका 

बदनापूर तालुक्यातील रोषणगाव, अंबडगाव, बाजार वाहेगाव, वाकुळणी, धोपटेश्वर, माळेगाव, कुसळी, देवगाव, कस्तुरवाडी, कडेगाव, वरुडी, सायगाव, डोंगरगाव आदी बहुतांशी गावातील पिकांना पावसाने हिरावून नेले आहे. 

संकटांची जणू मालिकाच 

बदनापूर तालुक्यातील या भागावर संकटांची जणू मालिकाच सुरू आहे. मागच्या दिवाळीत बेमोसमी पाऊस झाला, त्यात उभी पिके आडवी झाली. त्यानंतर कोरोनाचे संकट उभे राहिल्याने लॉकडाउन करण्यात आले, त्यात बाजारपेठ न मिळाल्याने फळपिके फुकटभाव विकावी लागली. त्यात पुन्हा अतिवृष्टीने ग्रासल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले आहेत. मागील तीन वर्षांपासून वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करणारे शेतकरी पुरते कंगाल झाले आहेत. त्यांच्याकडे आता दुबार पेरणीची ऐपत राहिलेली नाही. महागडे बियाणे, खते कुठून खरेदी करावीत? असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

उरल्या - सरल्या पिकांवरही घाला 

रोषणगाव परिसरात पुन्हा बुधवारी (ता. २९) झालेल्या पावसाने उरल्या - सुरल्या पिकांवरही घाला घातला आहे. नुकसानीची पाहणी, पंचनामा करण्यात वेळ दवडत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांना आता पिकांच्या नुकसानीच्या अनुदानासह दुबार पेरणीसाठी तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे. 

रोषणगाव मंडळांत सातत्याने अतिवृष्टी होत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेताला तलावांचे स्वरूप प्राप्त झाल्याने अशा पाण्यात पिके जगतील तरी कशी? प्रशासनाने यापूर्वी केलेल्या पीक पंचनाम्याच्या आधारावर शासनाकडे पाठपुरावा करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी. 
- बाळासाहेब वाकुळणीकर ,
जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

रोषणगाव मंडळातील बहुतांशी गावांत अतिवृष्टीने पिके होत्याची नव्हती झाली आहेत. सातत्याने पाऊस होत असल्यामुळे पिके पिवळी पडून करपली आहेत. शासनाने या भागातील शेतकऱ्यांचा नुकसानीच्या मदतीसह पीकविमादेखील मंजूर करावा. 
- राजेश जऱ्हाड, 
सरपंच : अंबडगाव 

(संपादन : संजय कुलकर्णी)