पोटच्या तीनही लेकींचे लैंगिक शोषण, नराधम मुख्याध्यापकास पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

बीड जिल्ह्यातील एका नराधम मुख्याध्यापकाने स्वत:च्या पेाटच्याच तीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. नराधम मुख्याध्यापकास सात एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

केज (जि. बीड) - शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या एका नराधम मुख्याध्यापकाने स्वत:च्या पेाटच्याच तीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. नराधम मुख्याध्यापकास सात एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

नात्याला काळिमा फासणाऱ्या घडलेल्या घटनेने केज तालुक्यातील खळबळ उडाली असून, शुक्रवारी (ता. तीन) नराधमास न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून या नराधम पित्यासह मुलीची आई, भाऊ, चुलते व चुलतभावांविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. एका संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक असलेल्या या ४८ वर्षीय नराधमाने पोटच्या दोन मुलींवर अत्याचार केला.

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

तिसरीचेही लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (ता. ३१) मध्यरात्री मुली झोपलेल्या असताना त्यांच्या खोलीत जाऊन त्याने थोरल्या मुलीला वाईट हेतूने स्पर्श केला. हा प्रकार आईला सांगू नको, याची वाच्यता करू नको म्हणून त्याने काठी व लाकडाने बेदम मारहाण करून दोरखंडाने गळा आवळून ठार मारण्याच्या प्रयत्न केला. घाबरलेल्या या मुलींनी हा प्रकार आईला सांगितल्यानंतर आईनेही ‘तुम्ही गप्प बसा, नाही तर तुम्हाला मारून टाकू,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा - परळीतील एक लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात

हा सर्व प्रकार त्या तिघी बहिणी जिवाच्या भीतीने सहन करीत होत्या. मात्र, अन्याय सहन न झाल्याने हा प्रकार एका मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मावशीला सांगितला. मैत्रिणीच्या मावशीच्या मदतीने ही माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याद्वारे पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी त्या पीडित मुलींना भेटून त्यांच्याकडून संपूर्ण हकिकत ऐकून घेतली. माहिती मिळताच केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पित्यास अटक करण्यात आली.

हेही वाचा - यंदा हाताला मेहंदी नव्हे, सॅनिटायझर लावण्याची वेळ

प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली. याप्रकरणी पित्यासह आई, भाऊ, चुलते व चुलत भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीस शुक्रवारी (ता. तीन) न्यायालयासमोर हजर केले असता, सात एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape of his own daughters, father arrested in police custody