esakal | आष्टी-साबलखेड रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

आष्टी (जि.बीड) : आष्टी ते कडा-साबलखेड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तालुक्यातील कडा येथील आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे पाऊणतास वाहतूक विस्कळित झाली होती.

आष्टी-साबलखेड रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : आष्टी-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी ते कडा, साबलखेड या अंतराचा रस्त्याची मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे पूर्णपणे वाताहत झाली आहे. संबंधित विभागाकडे वारंवार दुरुस्तीसाठी विनंत्या करूनही रस्ता दुरुस्ती होत नसल्याने सोमवारी (ता.13) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे पाऊणतास विस्कळित झाली होती. आष्टी-नगर राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (National Highway Authority Of India) हस्तांतरीत झाला असून नगर (Ahmednagar) येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चिंचपूर ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, आष्टी (Ashti) शहरापासून पुढे साबलखेडपर्यंत या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत असून छोटे-मोठे अपघात नित्याने घडत आहेत. अपघातात दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

हेही वाचा: लस,मास्क नाही तर मोदक नाही! जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी देखावा

या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग नगर या कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप तारडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून तसेच पाठपुरावा करूनही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात न आल्याने कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी परिसरातील ग्रामस्थांसह सोमवारी (ता.13) कडा येथील आंबेडकर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी रमजान तांबोळी, संजय ढोबळे, संपत सांगळे, बाळासाहेब कर्डिले, अण्णासाहेब नाथ, युवराज पाटील, किशोर घोडके, दीपक गरूड, बबलू आखाडे, सचिन पोकळे, दत्ता ढोबळे, उपसरपंच संपत कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल पाऊणतास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे नगर-बीड रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती.

हेही वाचा: पक्षाचे निष्ठेने काम करा, फळ मिळतेच! भागवत कराडांचा सल्ला

तलाठी नवनाथ औंदकर व सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले. अभियंता दिलीप तारडे यांनी आष्टी ते धानोरा या रस्त्याचा डांबरीकरण कामाचा समावेश वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये करण्यात आला असून मंजुरी प्राप्त होताच कामास सुरवात करण्यात येईल. तसेच तसेच सद्यःस्थितीत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन दिवसांत हाती घेण्याच्या आश्वासनाचे पत्र तलाठी नवनाथ औंदकर यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांना दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

loading image
go to top