esakal | येवाची कृपा! रायगव्हाण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो,लातूरला दिलासा | Latur News
sakal

बोलून बातमी शोधा

रायगव्हाण (ता.कळंब) : मध्यम प्रकल्प रविवारी पहाटे ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून पाणी जाण्यास सुरवात झाली.

येवाची कृपा! रायगव्हाण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो,लातूरला दिलासा

sakal_logo
By
विकास गाढवे

मुरूड (जि.लातूर) : यंदा मराठवाड्यावर (Marathwada) पावसाने कधी नव्हे ती एवढी कृपादृष्टी दाखवली. यामुळेच लहानमोठे धरण व प्रकल्प तुडूंब भरून वाहू लागले. मात्र, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आणि लातूर तालुक्यासाठी उपयुक्त रायगव्हाण (ता. कळंब) येथील मध्यम प्रकल्प (Raygavhan Medium Water Project) भरला नव्हता. २७ सप्टेंबर रोजी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने प्रकल्पात पाणी येण्यास सुरवात झाली. त्यानंतर पावसाने उघडीप देऊनही प्रकल्पात पाण्याचा येवा सुरूच राहिला आणि रविवारी (ता. तीन) पहाटे पाच वाजता प्रकल्प काठोकाठ भरला. काही वेळातच प्रकल्पाच्या सांडव्यावरून एक सेंटीमीटरने पाणी वाहण्यास सुरूवात झाली. दोन जिल्ह्यांच्या सीमेवर हा प्रकल्प असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा लातूर जिल्ह्यासाठीच होतो. प्रकल्पाचे लाभक्षेत्र लातूर (Latur) तालुक्यातच (Rain) सर्वाधिक आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता १२.७०३ दशलक्ष घनमीटर असून प्रत्येक पावसाळ्यात प्रकल्पात खात्रीने पाणी येत नाही. प्रकल्पात मुरूड व परिसरातील दहा गावांच्या पाणी योजना आहेत. अनेकदा प्रकल्प कोरडाठाक पडला. याचा फायदा मध्यंत्तरी गाळाचा उपसा करण्यासाठी झाला.

हेही वाचा: महाविकास आघाडीला धक्का,सुभाष साबणे उद्या भाजपात करणार प्रवेश

प्रकल्पातील गाळाचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला. मराठवाड्यातील एकमेव गाळमुक्त मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला गेला. यामुळे प्रकल्पात पाणीसाठा पुनरूज्जीवीत झाला. गेल्या वर्षी ३२ टक्केच पाणी आले होते. २४ सप्टेंबरपर्यंत प्रकल्पाच्या मृतसाठ्यातच पाणी होते. त्यानंतर हळूहळू पाणी येण्यास सुरवात झाली. २७ सप्टेंबर रोजी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने प्रकल्पात पाणी येण्याचे वेग वाढला. यातूनच एका दिवसात प्रकल्पात ऐंशी टक्के पाणीसाठा आला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली तर पाण्याचा येवा सुरूच होता. दोन दिवसापासून धरण शंभर टक्के भरण्याची प्रतीक्षा होती. ती रविवारी पहाटे पाच वाजता संपली व प्रकल्प शंभर टक्के भरला. त्यानंतर प्रकल्पाच्या सांडव्यावरून एक सेंटीमीटरने पाणी वाहण्यास सुरवात झाल्याची माहिती येथील रायगव्हाण जलसिंचन शाखेचे शाखा अभियंता बिभीषण सावंत यांनी दिली.

हेही वाचा: शिवसेने सोबत युती हीच भाजपाची सर्वात मोठी चूक : गणपत गायकवाड

३४ वर्षांत सहा वेळा भरले

प्रकल्पाची उभारणी १९८७ मध्ये झाली तरी हा प्रकल्पात दरवर्षी शंभर टक्के पाणीसाठा होत नाही. ३४ वर्षात प्रकल्प पाच ते सहावेळा भरला आहे. चार वर्षापासून प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आला नव्हता. यामुळेच प्रकल्पातून मांजरा धरणातील पाणी आणण्याचे नियोजन झाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रायगव्हाण फिडर कालवा मंजूर केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. आता मांजरा नदीवरील बॅरेजेसवरून फिडर कालव्याची योजना आखण्यात आली असून त्याच्या सर्वेक्षणालाही जलसंपदा विभागाने मंजूरी दिली आहे.

loading image
go to top