परभणी जिल्ह्यात काय घडले आज दिवसभरात वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

परभणीसह पूर्णेत जुगारावर छापा, आठ जणांवर गुन्हा  

पूर्णा ः स्थानिक गुन्हे शाखा परभणीच्या पथकाला येथील सिद्धार्थनगर, रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी कल्याण नावाचा मटका जुगार चालवताना पाच आरोपी आढळून आले. यामध्ये नगदी सात हजार नऊशे नव्वद रुपये व जुगार साहित्य मिळाले असून पूर्णा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा (ता. १४) गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखा परभणीच्या पथकातील फिर्यादी शिवदास विठ्ठलराव धुळगुंडे, हनुमंत मानेजी जक्केवाड, बालासाहेब तुकाराम तुपसुंदरे आदींनी एकाच वेळी शहरातील सिद्धार्थनगर, रेल्वे स्टेशन परिसर, सिद्धार्थनगर शुभम पानसेंटर जवळील मुख्य रस्त्यावर कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या सहा आरोपींवर गुन्हा नोंदविला. त्यात दादाराव राघोजी कांबळे, फारूख, सुनील रतन गरडवाल, विद्यानंद तेजबंद, भीमराव रुस्तुमराव रोडगे आदी पाच आरोपींजवळ एकूण सात हजार नऊशे नव्वद रुपये व जुगार साहित्य मिळून आले. तपास सय्यद मोईन करीत आहेत. 

उड्डाण पुलाखाली जुगार अड्ड्यावर छापा
परभणी ः रमाबाईनगर ते उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुगाराची बुकी चालविणाऱ्या तीन आरोपींना शुक्रवारी (ता. १४) कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १८ हजार १७० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. रमाबाईनगरकडून उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुगाराची बुकी सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. पी. पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने पथक तयार करून त्यांना घटनास्थळी पाठविले असता, त्या ठिकाणी आरोपी गौतम आबाजी वावळे (रा. भीमनगर,परभणी), संजय दादाराव पवार (रा. औरंगाबाद) व अंकुश खुणे (रा. खंडोबा बाजार) यांना पोलिसांनी जुगार घेताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १८ हजार १७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आदोडे, श्री. शहाणे, श्री. कोल्हे, श्री. मोसीन यांनी केली आहे. 

जीवन प्राधिकरण कार्यालयात चोरी
परभणी ः महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात गुरुवारी (ता. १३) रात्री चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील शासकीय औषधी भांडाराच्या दाराची कोंडी वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. भांडारामध्ये असलेले संगणक मॉनिटर दोन नग, सीपीयू जुने वापरातील एक नग, किबोर्ड जुने वापरातील दोन नग, माऊस जुने वापरातील दोन नग, इनव्हर्टर जुने वापरातील एक नग, बॅटरी जुने वापरातील दोन नग, असा एकूण २७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कर्मचारी अरुण विश्वनाथ पेडगावकर यांनी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. बनसोडे करीत आहेत. 

भाग्यलक्ष्मीनगरमध्ये एकाची आत्महत्या
परभणी ः शहरातील भाग्यलक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १४) उघडकीस आली. संदीप शेंडे (वय ४०) असे मयत इसमाचे नाव आहे. सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद घेण्यात आली आहे. 

हेही वाचा - कुठे घाटेअळी तर कुठे थंडीमुळे वाढ खुंटली

सिगारेटसाठी एकास मारहाण
परभणी ः पान व सिगारेट उधारी का देत नाहीस म्हणून एका पानपट्टीचालकास दोघांनी मिळून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. १३) घडली. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत रस्त्यावरील कन्हैय्या हॉटेलच्या बाजूस विजयकुमार नवनाथ जावळे यांची पानपट्टी आहे. या ठिकाणी आरोपी प्रमोद शिंदे व दीपक काळबांडे हे दोघे गुरुवारी (ता. १३) पान खाण्यासाठी आले होते. या दोघांनी विजयकुमार जावळे यांना उधारी पान व सिगारेट मागितली. परंतु, जावळे यांनी नकार दिल्याने दोन्ही आरोपींनी विजयकुमार जावळे यांना लाकडी काठीने व बुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक टाकरस हे करीत आहेत. 

हेही वाचा - दोन दशकांपासून रखडलेल्या भूसंपादनासाठी ६८ कोटी मंजूर

उरूस यात्रेत दुचाकी लावण्यावरून हाणामारी
परभणी ः उरूस यात्रेत मोटारसायकल लावण्यावरून एकास मारहाण केल्याची घटना (ता. ११) फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दर्गा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर तुकाराम पौळ (रा. हसनापूर, ता. परभणी) हे ता. ११ फेब्रुवारी रोजी दर्गा परिसरात गेले होते. त्या वेळी त्यांनी त्यांची मोटारसायकल एम. के. पार्किंगच्या बाजूस लावली होती. ते उरूस यात्रेतून आल्यानंतर मोटारसायकल काढत असताना दोघांनी त्यांना २० रुपयांची मागणी केली. परंतु, आपण मोटारसायकल पार्किंगमध्ये लावली नाही, असे सांगून पैसे देण्यास नकार दिला. यावरून वाद वाढला. दोन्ही इसमांनी ज्ञानेश्वर पौळ यांना लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उरुसात चोरी करणाऱ्या महिलांना पोलिस कोठडी
परभणी ः उरूस यात्रेत आलेल्या भाविकांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेणाऱ्या दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ता. १२ फेब्रुवारी रोजी यात्रेत आलेल्या संगीता संदीप पवार या महिलेसह इतर तिघांचे दागिने चोरीला गेले. त्यानंतर चोरी करताना दोन महिला पोलिसांच्या हाती लागल्या. शांताबाई हिरामन जाधव व सोनाबाई संजय पवार या दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या दोन्ही महिलांना शुक्रवारी (ता. १४) न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस नायक व्ही. बी. कुकडे हे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read what happened in Parbhani district today ...