कुठे घाटेअळी तर कुठे थंडीमुळे वाढ खुंटली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

जोमात असणाऱ्या पिकांना वातावरणाचा फटका

परभणी ः जिल्ह्यात सध्या गहू, हरभरा आणि ज्वारी पिके जोमात असली तरी काही पिकांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला असून थंडीअभावी गव्हाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे विद्यापीठाने उपाययोजना सुचविल्या आहेत.

जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात आली आहेत. आता दोन दिवसांपासून लख्ख सूर्यप्रकाश पडू लागल्याने काही अंशी पिकांना दिलासा मिळू लागल आहे. याआधी सतत महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात आली होती. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे, तर गहू पिकाची वाढ खुंटली आहे. 

हेही वाचा - ‘व्हॅलेटाईन डे स्पेशल’ : ‘अशू-मशू’ची यशस्वी प्रेम कहाणी...

रब्बी पेरणीच्या क्षेत्रात वाढ 
सध्या ज्वारी पोटऱ्यात आली असून दाणे भरण्यास सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी ज्वारीला पाणी दिले जात आहे. यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने जमिनीत ओल चांगली राहिली आहे. त्यामुळे ज्वारीची उगवण शक्ती वाढली होती. त्याचा परिणाम म्हणून सर्वत्र ज्वारी चांगल्या प्रकारे वाढली आहे. तसेच हरभरा पिकाचेदेखील क्षेत्र वाढले आहे. त्यात जायकवाडीसह अन्य प्रकल्पांतून पाणी सोडल्याने रब्बी पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या ही सर्व पिके जोमात आहेत. मात्र, काही पिकांना वातावरणाचा फटका बसला आहे.

हेही वाचा - नळजोडणी दर कमी करण्यासाठी सरसावले सर्वच पक्ष

अशा करावी उपाययोजना
उशिरा पेरणी केलेल्‍या हरभरा पिकात घाटे भरण्‍याच्‍या अवस्‍थेत पिकास पाणी द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्‍के ४०० मिली किंवा इमामेक्‍टिन बेन्‍झोएट पाच टक्‍के ८० ग्रॅम प्रतिएकर फवारणी करावी. उशिरा पेरणी केलेल्‍या गहू पिकात दाणे भरण्‍याचा अवस्थेत पिकास पाणी द्यावे. गहू पिकावरील खोडमाशीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी सायपरमेथ्रिन दहा टक्के ईसी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. ऊस वाढीच्या अवस्‍थेत पिकात पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्‍यास हेक्‍टरी दोन ते तीन ट्रायकोकार्ड दहा दिवसांच्‍या अंतराने चार ते सहा वेळा वापरावे. तसेच याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरिफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनिल पाच टक्के ३० मिली प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where deficit and cold cause growth