गोपीनाथ मुंडेंचा सैनिक म्हणून निवडणुकीत उतरतोय, रमेश पोकळेंचे सूचक विधान; बोराळकरांसमोर आव्हान

ई सकाळ टीम
Wednesday, 18 November 2020

पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश पोकळे यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.

बीड : पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश पोकळे यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. मंगळवारी (ता.१७) पोकळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. रमेश पोकळे म्हणाले, की  भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात व शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. रितसर पक्षाचा  दुसरा उमेदवारी द्यावी म्हणून विनंती केली होती.

सतीश चव्हाणांच्या समर्थनार्थ अर्ज मागे घेतला, जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका

मात्र विनंती मान्य केली गेली नाही. मतदारांच्या स्वाभिमान, आत्मसन्मानासाठी मी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने निवडणुकीत उतरतोय, असेही भाजपचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मागितली होती. गोपीनाथ मुंडे यांचा सैनिक व शैक्षणिक क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरत आहे. विद्यापीठातला गेल्या वीस वर्षांचा मला अनुभव असल्याचे सांगून भाजपमध्ये आपण निवडणुकीसाठी पात्र उमेदवार असल्याचे सूचित केले. पदवीधरांच्या सन्मानासाठी निवडणुकीत उतरत असल्याचे ते म्हणाले.

आता पक्ष सोडावा लागेल असे विचारले असता हो म्हणत रमेश पोकळे यांनी पक्षात आपण नसल्याचे सांगितले. पक्षासाठी जिवाचा रान करणारा मी कार्यकर्ता आहे. सन्मानासाठी व स्वाभिमानासाठी मी निवडणुकीत उतरतोय. चळवळीतला उमेदवार हवा, अशी भावना पदवीधरांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व भारतीय जनता पक्षाने दिलेले उमेदवार यांचा शैक्षणिक चळवळीशी संबंध नाही. निवडणुका लागल्या की ते पदवीधरांमध्ये जातात. ते दोघेही उद्यागोमध्ये व गुत्तेदारीमध्ये व्यस्त असतात. म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील सच्चा कार्यकर्ता म्हणून मतदारांसमोर जात आहे, असे पोकळे यांनी सांगितले.

   
संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebal Ramesh Pokale Challenge Before Shirish Boralkar In Aurangabad Graduate Election