शेतमालाची विक्री करताना पक्की पावती घ्यावी : दत्ता बोंढारे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

भविष्यात शासनाने शेतीमालास अनुदान मंजूर केल्यास शेतमाल विक्री केल्याची व्यापाऱ्यांची पक्की पावती लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करताना पक्की पावती घ्यावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती दत्ता बोंढारे यांनी केली आहे. 

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : शेतकरी बांधवांनी परवानाधारक व्यापाऱ्यांनाच शेतमालाची विक्री करावी, तसेच त्यांच्याकडून पक्की पावती घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता बोंढारे पाटील यांनी केले आहे. भविष्यात शासनाने शेतीमालास अनुदान मंजूर केल्यास या पावतीचा उपयोग शेतकऱ्यांना होणार असल्याचे ते म्हणाले.

आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत १२५ गावे असून सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करणे कठीण झाले होते. त्यामुळे विक्रीअभावी शेतमाल शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला होता. सभापती दत्ता बोंढारे यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून शेतमाल खरेदी विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. 

हेही वाचा लॉकडाउनमध्ये चार हजार मजुरांना ‘रोहयो’चा आधार...कोठे वाचा

शेतमाल खरेदीविक्रीचा मार्ग मोकळा

त्यानंतर बाजार समितीतंर्गत शेतमाल खरेदी विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे शेतमाल खरेदीविक्रीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, १२५ गावांमधून बाजार समितीने खरेदी विक्रीचे परवाने दिलेल्या व्यापाऱ्यांनाच शेतमाल विक्री करावा, व्यापारी योग्य दराने शेतमाल खरेदी करत नसल्यास त्याबाबतची तक्रारही बाजार समितीकडे करावी. 

पावती दिल्याशिवाय शेतमाल विक्री करू नये

व्यापाऱ्यांनी पक्की पावती व बाजार समितीची पावती दिल्याशिवाय शेतमाल विक्री करू नये, असे आवाहनही सभापती श्री. बोंढारे यांनी केले आहे. भविष्यात शासनाने शेतमालास अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यास शेतमाल विक्री केल्याची पक्की पावती अनुदान मिळविण्यासाठी उपयोगाला येणार आहे.

बाजार समितीकडे तक्रार करण्याचे आवाहन

 तसेच शेतकऱ्यांना याबात अडचण आल्यास बाजार समिती, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल, असे श्री. बोंढारे म्हणाले. काही तक्रार असल्यास बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांकडे करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

फुलविक्रेते सापडले अडचणीत

औंढा नागनाथ : येथे नागनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असल्याने बारमाही फुलविक्रीचा व्यवसाय चालतो. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद झाले असून लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम बंद झाले. त्यामुळे फुलांची विक्रीही बंद झाल्याने फुलउत्‍पादकांसह विक्रेते अडचणीत सापडले आहेत.

येथे क्लिक करातलावात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू...कोठे ते वाचा

तीन एकरांत फुलशेती

तालुक्‍यातील माथा गावातील शेतकरी चंद्रकांत गोबाडे यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यांनी तीन एकरांत फुलशेती केली आहे. त्यामध्ये दोन एकर गुलाब; तर एक एकरमध्ये लिली फुलशेती आहे. चार हजार गुलाब व पाच हजार लिली लागवड केली असून दररोज फुले तोडून औंढा नागनाथ येथील किरकोळ फुलविक्रेत्यांना तसेच विविध कार्यक्रम, लग्नसराईत त्‍याची विक्री करत असतात.

शासनाने त्‍यांना मदत करावी

परंतु, कोरोनामुळे सध्या सर्व बाजारपेठ, समारंभ, मंदिर, मार्केट बंद असल्याने त्यांचे हंगामाचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एक एकरमधील लिली फुलांचे कंद जाळून टाकले आहेत. शासनाने त्‍यांना मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Receipt should be taken while selling agricultural commodities: Datta Bondhare Hingoli news