बीडमध्ये लाचखोरीत महसूल विभाग अव्वल; वर्षभरात वर्ग एकचे दोन तर, दोनचे सात अधिकारी जाळ्यात

पांडुरंग उगले
Tuesday, 29 December 2020

यंदाच्या २०२० वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाभरात केलेल्या कारवाईत ३५ लाचखोरांना अटक करून १३ लाख २९ हजार ४२० एवढी लाचेची रक्कम हस्तगत केली.

बीड : यंदाच्या २०२० वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाभरात केलेल्या कारवाईत ३५ लाचखोरांना अटक करून १३ लाख २९ हजार ४२० एवढी लाचेची रक्कम हस्तगत केली. यात ११ लाचखोरांसह महसूल विभाग अव्वल राहिला असून, त्या खालोखाल पोलिस विभागातील आठ लाचाखोरांवर कारवाई केली. यात वर्ग एकचे दोन तर, वर्ग दोनच्या सात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जवळपास सर्व शासकीय कार्यालयांना लाचखोरीचे ग्रहण लागलेले असून फाईल, हातावर वजन ठेवल्याशिवाय सर्वसामान्यांचे काम होत नाही.

 

 
 

लाच देणे, लाच घेणे कायद्याने गुन्हा असून त्याची अमलबजावणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होते. २०२० वर्षात या विभागाने चांगली कामगिरी बजावली असून, जिल्ह्यातील ३५ लाचखोरांवर कारवाई करून त्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यंदा वर्ग एकचे दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले असून, यात अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त कृष्णा नामदेव दाभाडे, वडवणीचे तहसीलदार श्रीकिसन देवराव सांगळे यांचा समावेश आहे.

 

 

यावर्षी लाच स्वीकारण्यात महसूल विभागाने पहिला क्रमांक पटकावला असून ११ लाचाखोरांना जाळ्यात घेत एक लाख ३९ हजार ४२० रुपयांची लाचेची रक्कम हस्तगत केली. त्याखालोखाल पोलिस विभागातील सात लाचखोर सापळ्यात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात बँक, शासनाच्या विविध १० विभागात २१ कारवाया करून ३५ आरोपींना अटक करीत १३ लाख २९ हजार ४२० एवढी लाचेची रक्कम हस्तगत केली.

कोणत्या विभागात किती लाचखोर
महसूल विभाग, ११ आरोपी, पोलीस विभाग ८ आरोपी, जि.प., पंचायत व शिक्षण ४, जिल्हा सहकारी बँक ३, अन्न व औषध, नगर विकास, सहकार विभाग प्रत्येकी २ तर, जिल्हा रेशीम, जात पडताळणी, अर्बन को ऑप. बँक प्रत्येकी एक अशा एकूण ३५ लाचखोर आरोपीवर कारवाई केली.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Department Top In Bribe Cases Beed News