
आष्टी तालुक्यात अवैध वाळूउपशाविरुद्ध महसूल विभागाने कंबर कसली असून ठिकठिकाणी गुन्हे दाखल करून दंड वसुलीच्या कारवाया सुरू आहेत.
आष्टी (बीड) : गाळपेरा जमिनीतून बेकायदेशीररित्या अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. तालुक्यातील देविनिमगाव येथे शनिवारी (ता. 12) तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्त्वाखाली पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा : मला लाड नको, मला आशीर्वाद हवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आष्टी तालुक्यात अवैध वाळूउपशाविरुद्ध महसूल विभागाने कंबर कसली असून ठिकठिकाणी गुन्हे दाखल करून दंड वसुलीच्या कारवाया सुरू आहेत. तालुक्यातील देविनिमगाव येथे रियाज शेख यांच्या गाळपेरा जमिनीतून अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती खब-यांमार्फत तहसीलदार राजाभाऊ कदम यांना प्राप्त झाली होती.
हे ही वाचा : शरद पवारांच्या धाडसी निर्णयामुळेच भूकंपग्रस्त ५२ गावांना हक्काचे, पक्के घरे मिळाली
त्यानुसार कदम यांनी शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, मंडळ अधिकारी इंद्रकांत शेंदूरकर, तलाठी प्रवीण बोरूडे व अरूण जवंजाळ यांच्यासह धाड टाकली असता तीन ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले.
महसूलच्या पथकाने वाळूउपसा करणारी चारही वाहने ताब्यात घेत कडा पोलिस चौकीच्या आवारात आणून लावली आहेत. या प्रकरणी अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी सकाळशी बोलताना दिली.
संपादन - सुस्मिता वडतिले