
आष्टीतील जोगेश्वरी पारगाव येथे शोधमोहीमेस सुरवात
आष्टी (बीड) : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक बिबट्याने आठवडाभरात तीन बळी घेतल्याने शहर व परिसरात प्रचंड दहशत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. याच परिसरात बिबट्या दबा धरून बसला असल्याचा अंदाज असून त्याला शोधण्यासाठी पुणे येथील राणाज रायफल क्लबची टीम वनविभागाच्या मदतीला आली आहे. टीममधील रायफल एक्स्पर्ट या भागातील बिबट्याचा वावर शोधणार आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
रविवारी (ता. 29 नोव्हेंबर) रोजी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथे बिबट्याने सुरेखा भोसले या महिलेवर हल्ला करून ठार केल्यानंतर वन विभाग या बिबट्याचा शोध घेत आहे. तीन दिवस उलटल्यानंतरही अद्याप वनविभागाला बिबट्याचा शोध लागलेला नाही. वनविभागाच्या सर्व टीम, गावकरी, स्वयंसेवक पथके यांना गुंगारा देण्यात बिबट्या यशस्वी होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
वनविभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असून घटना घडली त्या परिसरात पिंजरे लावून त्यामध्ये ट्रांक्युलयझर टीमचे शूटर बसविण्यात आले आहेत. बिबट्यासाठीचे भक्ष बोकड पिंजऱ्या बाहेर ठेऊन त्याला बेशुद्ध करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. बिबट्याला चकविण्यासाठी मानवी बाहुल्या तयार करून विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या असून या सर्व उपायांना बिबट्याने गुंगारा दिल्याचे स्पष्ट होत आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील या बिबट्याला शोधण्यासाठी राणाज रायफल क्लबचे संचालक डॉ चंद्रकांत मंडलिक यांच्यासह सदस्यांची टीम जोगेश्वरी पारगाव येथे दाखल झाली आहे. यापूर्वी बिबट्याच्या शोध मोहिमेसाठी काम करण्याचा या टीमला अनुभव असून विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्याचा माग काढण्यात ही टीम एक्सपर्ट असून आजूबाजूच्या गावक-यांनीही दक्ष राहावे, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांनी केले आहे.
(संपादन-प्रताप अवचार)