esakal | खुल्या बाजारात वाढला 'दर', हमीभाव केंद्रांना आली मरगळ, उस्मानाबादेतील चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

soyabin market.jpg
  • सोयाबीनला चार हजारांचा भाव. 
  • शेतकऱ्यांमध्ये समाधान. 

खुल्या बाजारात वाढला 'दर', हमीभाव केंद्रांना आली मरगळ, उस्मानाबादेतील चित्र

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यात सोयाबीनचे दर चार हजारापर्यंत पोचल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे. यंदा पहिल्यांदाच सोयाबीनचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, खुल्या बाजारातील दर वाढल्याने शासनाच्या हमीभाव केंद्राकडे शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. खरीप हंगामात तीन महिन्याचे पीक शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून ओळखले जाते. यंदा सुमारे अडीच ते तीन लाख हेक्टर क्षेत्रांवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. गेल्या तीन-चार वर्षांत जिल्ह्यात दुष्काळाचे सावट होते. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाने तारले होते. मात्र, कधी कमी भाव तर कधी अतिपावसाने सोयाबीनला फटका बसत होता. यंदाही अतिपावसाने सोयाबीनला फटका बसला आहे. असे असले तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन चांगल्या स्थितीत आहे. त्यात दरही योग्य मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती; तसेच १५ ऑक्टोबरपासून खरेदी करण्याचे धोरण निश्चित केले होते. मात्र, त्यामुळे खुल्या बाजारातील सोयाबीनचे दर वाढले आहेत. सध्या शासनाकडून सोयाबीनला प्रतिक्विंटल तीन हजार ८८० रुपये दर आहे. पण, खुल्या बाजारात चार हजारापर्यंत गेल्याने शासनाच्या हमीभाव केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अनेकांकडे साठा 
गेल्या वर्षी सोयाबीनचा भाव चार हजार ४०० रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. यामध्ये वाढ होऊ शकते. असे म्हणत काही शेतकऱ्यांना प्रती क्विंटल पाच हजार रुपये भाव येऊ शकतो, म्हणून विक्री केली नाही. अशा अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा साठा आहे. अशा शेतकऱ्यांना यंदा चांगला भाव मिळण्याचे संकेत मिळत आहेत. 

जागतिक बाजारातही दर तेजीत 
यंदा पहिल्यांदाच सोयाबीनचा दर चार हजारापर्यंत गेला आहे. जगामध्ये अमेरिका, ब्राझील अशा देशात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. तेथील दरावरच देशातील सोयाबीनचा दर निश्चित होतो. यंदा सोयाबीनला चांगला दर राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात सध्या सोयाबीन चार हजारापर्यंत पोचल्याने अनेकांनी विक्रीस काढले आहे. 

गेल्या वर्षी चार हजार ४०० रुपये अंतिम दर मिळाला. मात्र, नंतर तीन हजार ७०० रुपयांपर्यंत आला होता. त्यामुळे आम्ही विक्री केली नाही. यंदा चांगला भाव येईल, अशी अपेक्षा आहे. सध्या खुल्या बाजारात चार हजार रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव केंद्रावर जाण्याचा प्रश्न येत नाही. 
- विश्वनाथ पाटील, सोयाबीन उत्पादक. 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image