नांदेडला रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार ः अशोक चव्हाण

अभय कुळकजाईकर
Thursday, 16 April 2020

नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण
यांनी दिली आहे. तसेच मुखेड - देगलूर रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

नांदेड - कोरोना या वैश्वीक महामारीमुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्यातील रस्ते निर्मितीचे काम बंद पडले आहे. परंतु ता. २० एप्रिलनंतर लॉकडाऊनच्या काळात काही बाबींना सूट देण्यात आली आहे. त्यात रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. लवकरच रस्त्यांची कामे सुरू करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. १६) दिली. त्यासोबतच मुखेड - एकलारा - खानापूर - देगलूर या रस्त्यांचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी  दिले आहेत.

कोरोनामुळे राज्यातील उद्योगधंदे बंद पडले आहेत, विकास कामांना खिळ बसली आहे, शेती मालाला विक्रीसाठी बाजारपेठा नाहीत. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. राज्यातील बिघडलेल्या अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक विश्लेषण करून उपाययोजना सुचविण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. 

हेही वाचा - नांदेड महापालिकेच्या फिरत्या रुग्णवाहिकेतून तपासणी...

कामे लवकरच हाती घेण्यात येणार 
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मंत्रिमंडळ गटाची बैठक झाली. या बैठकीमध्ये लॉकडाऊनमधून कोणकोणत्या घटकांना वगळणे शक्य आहे, या विषयी चर्चा झाली. त्यानंतर केंद्र सरकारकडून या संदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या असून त्यामध्ये शेती कामासह अनेक विषयांना लॉकडाऊनमधून सुट देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची पायमल्ली न होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते निर्मितीच्या कामांचा समावेश आहे. विशेषतः नांदेड सारख्या कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

कंधार, मुखेडला घेतली आढावा बैठक
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण हे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा सध्या दौरा करत आहेत. त्यांनी नुकतेच कंधार आणि मुखेड येथे जाऊन कोरोना व संभाव्य पाणी टंचाई या विषयी आढावा बैठक घेतली. या दरम्यान मुखेड व्हाया - एकलारा - खानापूर - देगलूर या रस्त्यांविषयी अनेकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. नागरिकांच्या या तक्रारींची तत्काळ दखल घेत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले. 

हेही वाचलेच पाहिजे - व्हिडिओ: नागनाथ मंदिरात होते दिवसातून तीन वेळेस पूजा

काम सुरू करण्याचे आदेश 
लोहा - कंधार - अंबुलगा - मुखेड - एकलारा - खानापूर इथपर्यंत जाणाऱ्या या रस्त्यावर शासनाने २४२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हॅब्रिट अ‍ॅन्युईटी योजनेंतर्गत होणाऱ्या या रस्त्यामुळे मुखेड ते देगलूर या दोन शहरातील ३० किलोमीटरचे अंतर कमी होणार असून वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे या रस्त्याला प्राधान्य देवून तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश संबंधितांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road work will start soon in Nanded: Ashok Chavan, Nanded news